राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे प्रदेश काँग्रेसचा ठराव

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
Rahul Gandhi
Rahul GandhiANI
Published on

खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, असा ठराव सोमवारी प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा ठराव मंजूर करण्यात आला. यापूर्वी राजस्थान, छत्तीसगड राज्याने असे ठराव केले आहेत. सोबतच प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर केला गेला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रतिनिधींच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. तर खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती करणारा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. काँग्रेस पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यांने व्यवस्थित पार पडला असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, असे प्रदेश निवडणूक अधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रा सुरू केली असून, या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही पल्लम राजू यांनी यावेळी केले. ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून, या यात्रेच्या तयारीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in