दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नियमांची गरज नाही; जयशंकर यांची ग्वाही

मुंबईवर २००८ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यास ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आले त्यावरून जयशंकर यांनी यूपीए सरकारवर हल्ला चढविला. सरकारी स्तरावर अनेकदा चर्चा होऊनही तेव्हा त्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. कारण पाकिस्तानवर हल्ला करणे हे त्यांच्यावर हल्ला न करण्याहून अधिक जाचक ठरेल असे त्यांना वाटले, असेही एस. जयशंकर म्हणाले.
दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नियमांची गरज नाही; जयशंकर यांची ग्वाही
Published on

पुणे : सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारत बांधील आहे, दहशतवाद्यांसाठी कोणतेही नियम नाहीत, तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी देशात कोणतेही नियम असू शकत नाहीत, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

मुंबईवर २००८ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यास ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्यात आले त्यावरून जयशंकर यांनी यूपीए सरकारवर हल्ला चढविला. सरकारी स्तरावर अनेकदा चर्चा होऊनही तेव्हा त्यामधून काहीही निष्पन्न झाले नाही. कारण पाकिस्तानवर हल्ला करणे हे त्यांच्यावर हल्ला न करण्याहून अधिक जाचक ठरेल असे त्यांना वाटले, असेही ते म्हणाले.

'व्हाय भारत मॅटर्स : अपॉर्च्युनिटी फॉर युथ ॲण्ड पार्टिसिपेशन इन ग्लोबल सिनारिओ' या चर्चासत्रात जयशंकर यांनी युवकांशी संवाद साधला. मुंबईप्रमाणे आता पुन्हा एकदा हल्ला झाला आणि त्याला प्रत्त्युत्तर दिले नाही तर अशा प्रकारचा पुढील हल्ला कसा टाळता येईल, असा सवाल त्यांनी केला.

देशाचे परराष्ट्र धोरण २०१४ पासून बदलले आहे आणि त्यानुसार दहशतवादाचा मुकाबला केला जाईल, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देते हे भारताचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे आणि भारत कोणत्याही स्थितीत दहशतवाद सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले, मात्र दहशतवादाची समस्या २०१४ मध्ये उद‌्भवली नाही, तसेच ती मुंबईवरील हल्ल्यानंतरही आलेली नाही, ही समस्या १९४७ पासूनची आहे. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी होऊन हल्ला करण्यात आला तो दहशतवादी हल्लाच होता. घुसखोरांनी गावे, शहरे जाळली, हत्याकांड घडविले आणि पाकिस्तानच्या लष्कराची त्याला फूस होती, असेही जयशंकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in