ओला, उबर चालकांचे आज महाराष्ट्रभर आंदोलन; स्वातंत्र्यदिनी सेवा ठप्प होण्याची शक्यता

महाराष्ट्रात, मुंबईसह, ॲप-आधारित टॅक्सी व रिक्षा सेवा स्वातंत्र्यदिनी (शुक्रवार, १५ ऑगस्ट) ठप्प होण्याची शक्यता आहे. ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या राईड-हेलिंग प्लॅटफॉर्मशी संलग्न असलेले शेकडो ॲप-आधारित टॅक्सी व ऑटोचालक राज्यव्यापी आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत.
ओला, उबर चालकांचे आज महाराष्ट्रभर आंदोलन; स्वातंत्र्यदिनी सेवा ठप्प होण्याची शक्यता
Published on

कमल मिश्रा / मुंबई

महाराष्ट्रात, मुंबईसह, ॲप-आधारित टॅक्सी व रिक्षा सेवा स्वातंत्र्यदिनी (शुक्रवार, १५ ऑगस्ट) ठप्प होण्याची शक्यता आहे. ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या राईड-हेलिंग प्लॅटफॉर्मशी संलग्न असलेले शेकडो ॲप-आधारित टॅक्सी व ऑटोचालक राज्यव्यापी आंदोलनासाठी सज्ज झाले आहेत.

हे आंदोलन महाराष्ट्र गिग कामगार संघाच्या नेतृत्वाखाली होणार असून, मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसह प्रमुख शहरांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या बाहेर दिवसभर शांततापूर्ण निदर्शने केली जाणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सहभागी चालक आपली वाहने रस्त्यावर चालवणार नाहीत.

संघटनेचे नेते केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, या आंदोलनाचा उद्देश परिवहन क्षेत्रातील गिग कामगारांच्या "अवघड होत चाललेल्या आर्थिक परिस्थितीकडे" सरकारचे लक्ष वेधणे हा आहे.

"चालकांना मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर त्यांचे जगणे कठीण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी बहुतेक ॲप-आधारित टॅक्सी व रिक्षाचालक रस्त्यावर उतरलेले दिसणार नाहीत. आम्ही आरटीओ कार्यालयांच्या बाहेर तिरंगा फडकवून शांततापूर्ण पद्धतीने आपला विरोध नोंदवू," असे क्षीरसागर यांनी सांगितले.

हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्यदिनाशी जुळवून करण्यात आले असून, योग्य कामकाजाच्या अटींसाठीचा आपला आग्रह अधोरेखित करण्यासाठी आंदोलकांनी हा प्रतीकात्मक दिवस निवडला आहे.

शेकडो चालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याने, महाराष्ट्रभर विशेषतः दिवसाच्या वेळेत प्रवाशांना ॲप-आधारित वाहतूक सेवा मिळवताना अडचणी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गिग कामगार संघाने राज्य सरकारला विनंती केली आहे की, न्याय्य मोबदला, सामाजिक सुरक्षा लाभ आणि राईड-हेलिंग कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणाला आळा घालणारे नियम करावेत.

हे आंदोलन त्यांच्या पुढील टप्प्याच्या लढ्याची आखणी करण्यासाठीही व्यासपीठ ठरणार आहे. "आम्ही केवळ ॲग्रीगेटर कंपन्यांनाच नाही, तर सरकारलाही ठाम संदेश द्यायचा आहे की, गिग कामगार गंभीर संकटाचा सामना करत आहेत. आम्ही आता गप्प बसणार नाही. - राम नारायण यादव, टॅक्सीचालक

logo
marathi.freepressjournal.in