मुंबई : राज्यात सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण योजने’वरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सोशल मीडियावरून केलेल्या एका जाहिरातीतून ठिणगी पडली आहे. या जाहिरातीत ‘अजित पवार यांची लाडकी बहीण योजना’ असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील ‘महायुती’ सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेत १८ ते ६५ वयोगटातील राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत दीड कोटीहून महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. हे तिन्ही नेते राज्याच्या विविध भागात जाऊन या योजनेचा प्रचार करत आहेत. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत ‘अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना’, ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’, ‘महिलांच्या बँक खात्यात येणारे १,५०० रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे.’ ‘महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे’, असे संवाद ऐकायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिराती प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री हे सुरुवातीचे नाव वगळले आहे
यात ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून तिथे ‘दादाचा वादा’ अशी टॅगलाईन वापरल्याचे पाहायला मिळत आहे. यावरूनच अजित पवार यांची ही जाहिरात वादात सापडली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘जनसन्मान यात्रे’द्वारे राज्य पिंजून काढत आहे. याच माध्यमातून महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गुलाबी कॅम्पेन सुरू केले. हे करताना त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’चे श्रेय महायुतीच्या नेत्यांना वगळून एकट्यानेच घेण्याचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.
'लाडकी बहिण' योजना महायुतीचीच!
'मुख्यमंत्री लाडकी बहिण' योजना ही महायुतीची योजना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना याच नावाने ती पुढेही सुरुच राहिल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
एक कोटींहून अधिक महिलांना लाभ!
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनें’तर्गत आतापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले.
विरोधकांची जाहिरातीवर टीका
राष्ट्रवादीच्या जाहिरातीवरून विरोधकांनीही अजित पवारांवर टीका केली आहे. ‘शासनाची योजना, जनतेचा पैसा मात्र अजित पवार यांचा प्रचार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेत मिळणारे पैसे सरकारी तिजोरीतील आहेत. दादा काय स्वतःच्या घरच्या पैशातून योजना चालवत आहे का? असा सवाल काँग्रेसने करत या जाहिरातीवर आक्षेप घेतला.