गोडसे, भुजबळांमध्ये रस्सीखेच; नाशिकच्या जागेवरून वाद वाढण्याची चिन्हे

महायुतीत अद्याप जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यात नाशिकच्या जागेवरून तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसही पुढे सरसावले असून, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
गोडसे, भुजबळांमध्ये रस्सीखेच; नाशिकच्या जागेवरून वाद वाढण्याची चिन्हे

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत अद्याप जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यात नाशिकच्या जागेवरून तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसही पुढे सरसावले असून, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हेही आग्रही आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा वाढला आहे.

नाशिकच्या जागेवरून सुरुवातीपासूनच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना भाजपने विरोध केला आहे. त्यातच भाजपनेदेखील गोडसे यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी, असे सुचविले आहे. त्यातच भाजपचे दिनकर पाटील हेही तयारीला लागले होते. गोडसे यांना विरोध वाढल्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वादात पर्याय म्हणून ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्याचा मार्ग काढण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही तयारीला लागले होते. एवढेच नव्हे, तर दिल्लीतूनच वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला उमेदवारी देण्याविषयी आदेश दिले आहेत. त्यामुळे आपण तयारीला लागलो आहे, असे अगोदरच सांगितले होते. परंतु शिंदे गटाने या जागेचा दावा अद्याप सोडलेला नाही. उलट हेमंत गोडसे यांना शब्द देऊन हा प्रश्न चिघळत ठेवण्याचे काम केले जात असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे महायुतीत या जागेवरून वाद सुरू असतानाच ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन टाकलेली आहे. त्यामुळे ते आता तयारीला लागले असून, त्यांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत. मात्र, महायुतीत अजूनही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या जागेचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपनेही पुन्हा या जागेसाठी दावा ठोकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तिघांच्या भांडणात ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, हे पाहावे लागेल.

गोडसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे या जागेसाठी खूप आग्रही आहेत. त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन या जागेवर दावा सांगत आहेत. आज पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, तर तिकडे भुजबळांनी मतदारसंघात प्रचार सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवरून वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in