वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

गेल्या दीड महिन्यापासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून शेतात उभ्या असलेल्या आणि काढणी करून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त संग्रहित छायाचित्र
Published on

लासलगाव : गेल्या दीड महिन्यापासून वाढलेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून शेतात उभ्या असलेल्या आणि काढणी करून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाढत्या तापमानामुळे कांद्याची फुगवण थांबल्याने उत्पादनात घट झाली असून काढणीनंतर गंजी करून ठेवलेला कांद्याची प्रत खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात आज बुधवार २० रोजी ३८.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या दीड महिन्यात तालुक्यात तब्बल २६ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहिल्याने उष्णतेचा तीव्र परिणाम शेती पिकांवर दिसून येत आहे. विशेषतः कांद्याची योग्य वाढ व फुगवण न झाल्याने वजनात मोठी घट होऊन उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शेतात कांदा काढणीनंतर पातीखाली झाकून गंजी करून साठवण करत असतात. मात्र, यंदा वाढत्या उष्णतेमुळे साठवणीत ठेवलेला कांदा सडू लागला असून मोठ्या प्रमाणात प्रत खराब होत आहे. त्यामुळे आधीच बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना बियाण्या पासून ते बाजार समितीत विक्रीपर्यंत उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरीचा खर्च निघेल की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

अनुदानाची मागणी

आता पावसाळा जवळ आल्याने नवीन पिकांच्या लागवडीसाठी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० ते २००० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संपत जाधव यांनी केली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

लासलगावजवळील ब्राम्हणगाव (विंचूर) येथील कांदा उत्पादक शेतकरी संपत कारभारी जाधव यांनी दोन एकर क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड केली. मात्र, अतिउष्णतेमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले.

logo
marathi.freepressjournal.in