

"दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही...जय महाराष्ट्र", असं म्हणत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले होते रविंद्र चव्हाण?
लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविंद्र चव्हाण सोमवारी लातूरमध्ये आले होते. एका प्रचारसभेत ते लातूरच्या राजकारणाविषयी बोलत होते. यावेळी बोलताना, "खरं तर आपल्या सर्वांचा (भाजप कार्यकर्त्यांचा) उत्साह पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतंय, की शंभर टक्के विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून (लातूर) नक्कीच पुसल्या जातील, यात शंका नाही, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं.
त्यावरून रितेश देशमुखने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करत मोजक्या शब्दांतच खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. रितेशचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून त्याच्या व्हिडिओखाली प्रतिक्रियांचा, लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडतोय.
बघा व्हिडिओ
अमित देशमुखांनीही घेतला समाचार
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारणाला घेऊन चालला आहे हे दिसून येतंय. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. या वक्तव्याने आम्हा सर्व लातूरकरांची मने दुखावली आहेत. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे, अशा शब्दांत आमदार अमित देशमुख यांनीही समाचार घेतला आहे.
दरम्यान, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.