रियाधमध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी अडकले; विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल; सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली मदत

सौदी अरेबियातील रियाध येथे महाराष्ट्रातील सुमारे ४१ प्रवासी अडकले असून त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली आहे.
रियाधमध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी अडकले; विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल; सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली मदत
Published on

मुंबई : सौदी अरेबियातील रियाध येथे महाराष्ट्रातील सुमारे ४१ प्रवासी अडकले असून त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली आहे.

अकासा एअरचे मुंबईला येणारे विमान अचानक रद्द झाल्यामुळे भोकरदन येथील हे प्रवासी तेथेच अडकून पडल्याचा दावा सुळे यांनी केला आहे. या प्रवाशांना तात्काळ भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती राजनैतिक पावले उचलण्याची विनंती त्यांनी परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि रियाधमधील भारतीय दूतावासाला केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या मागणीनंतर रियाधमधील भारतीय दूतावासाने या प्रकरणाची दखल घेतली असून अकासा एअरकडून माहिती घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

अकासा एअरचा खुलासा

अकासा एअरने यावर खुलासा करताना सांगितले की, सुरक्षिततेच्या कारणास्तव रियाध, दोहा आणि कुवेतसह काही शहरांमधील विमान सेवा १२ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांना या बदलाची कल्पना आधीच देण्यात आली होती, असा दावाही कंपनीने केला आहे.

अकासा एअरने म्हटले आहे की, कोणतीही विमान सेवा अचानक रद्द केलेली नाही. बाधित प्रवाशांना विमान तिकिटाचे पूर्ण पैसे परत करण्याचा किंवा प्रवासाचे पुनर्नियोजन करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जे प्रवासी या बदलामुळे अडकले आहेत, त्यांच्याशी ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून संपर्क साधून पर्यायी प्रवासासाठी मदत केली जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती पाहून हे बदल करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जेद्दा आणि मुंबईसह इतर भारतीय शहरांदरम्यानची विमान सेवा मात्र सुरक्षितपणे सुरू असल्याचेही कंपनीने यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in