मुंबई : राज्यातील महामार्गावरील वाढत्या अपघाताबाबत दैनिक 'नवशक्ति'ने दिलेल्या बातमीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्ते अपघात रोखण्यासाठी गतिरोधकमुक्त यंत्रणा विकसित करावी तसेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबरोबरच अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात; तसेच रस्त्यांवर दिशादर्शक फलकांची संख्या वाढविण्यात यावी, अपघात होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करावी, पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी विभागाची प्रतिमा नेहमी उज्ज्वल ठेवण्याची दक्षता बाळगावी, असेही आवाहन सरनाईक यांनी केले. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी याबाबत म्हटले आहे की, पदोन्नतीने जबाबदारीत वाढ झाली आहे. वाहनांची संख्या, तंत्रज्ञान वाढत आहे. मोटार वाहन निरीक्षक हे विभागाची ओळख आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक आहे. परिवहन विभागाच्या सेवांची तुलना अन्य प्रगत देशाशी होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर असलेल्या सेवांची नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांच्या उंचावलेल्या अपेक्षापूर्तीसह अपघातांची संख्या रोखण्याचे आव्हान विभागासमोर आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपघातांची संख्या रोखण्यावर भर देण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी आयटीएमएस (इंटरनेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली उभारत आहेत. अपघाती मृत्यू मागील दोन वर्षांपासून कमी होत आहे. रस्ता सुरक्षा ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असेही विवेक भीमनवार म्हणाले.
याबाबत झालेल्या एका कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात ८ अधिकाऱ्यांना पद अलंकरण करण्यात आले. यावेळी पदोन्नत अधिकाऱ्यांना कर्तृत्वाची शपथ देण्यात आली.
पदोन्नत अधिकाऱ्यांच्या वतीने मोटार वाहन निरीक्षक प्रवीण हरदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी तर आभार विजय इंगोले यांनी मानले.
विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने अधिकारांबरोबरच जबाबदारीमध्येही वाढ झाली आहे. पदोन्नत अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर देण्याचे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.
राज्यात रस्ते अपघातात वाढ रस्ते अपघातात वाढ, रस्ते सुरक्षा समिती कागदावरच असे वृत्त दैनिक 'नवशक्ति'ने २३ ऑगस्ट रोजी दिले होते.