सह्याद्री अतिथीगृहात आगामी १०० दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतला.मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटक पोलीस तैनात करण्यात येणार असून केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल तसेच राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात आगामी १०० दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतला.
यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वन, नगरविकास, ग्रामविकास, महसूल, गृह आणि ऊर्जा यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे व अधिसूचना जाहीर करण्यासही यावेळी सांगण्यात आले.
मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील स्मारके अधिसूचित करण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन सल्लागार समिती स्थापन करण्यासह पर्यटन विकासासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलनालय विभागाकडून जलद मंजुरी आणि सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासह यावेळी सांगण्यात आले.
राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेेंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा- पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. अजंठा वेरूळ पर्यटन विकास आदी कामाला गती देण्यात येणार आहे. तसेच अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुंबईतील गोराई, मनोरीत थीम पार्क
मालवण येथे पाण्याखालील पर्यटनाचा अनुभव
तारकर्ली, काशिद किनाऱ्यावर ब्ल्यू बीच मोहीम
आंबेगाव येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क
पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक
नाशिक येथील राम-काल पथ विकास
मार्कडा, लोणार, कळसूबाईत टेंट सिटी
राज्यात पाच ठिकाणी शिवसृष्टी थीम पार्क
राज्यातील पर्यटनाचा आंतरराष्ट्रीय डंका
आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच रोड-शोसाठी महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, दिल्ली येथे होणारे भारत पर्व, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉनक्लेवमध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे.