धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार; ९ जून रोजी विशाखापट्टणम येथे होणार पुरस्काराचे वितरण

केंद्र शासन आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
(छायाचित्र सौजन्य - महासंवाद)
(छायाचित्र सौजन्य - महासंवाद)
Published on

धुळे : केंद्र शासन आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १० लाखांचा रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आंध्र प्रदेशातील नोव्होटेल, विशाखापट्टणम येथे ९ जून रोजी होणाऱ्या २८ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२३-२४ स्पर्धेसाठी धुळे जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर रोहिणी, ता़. शिरपूर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती़. तर या स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून १८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती, त्यात राज्यात पहिला क्रमांक मिळवून शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतींची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली होती. या स्पर्धेसाठी देशभरातून फक्त ६ ग्रामपंचायती या पुरस्काराच्या स्पर्धेत होत्या.

महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीस सुवर्ण पुरस्कार, पश्चिम मजलीशपूर, जि. पश्चिम त्रिपुरा (त्रिपुरा) ग्रामपंचायतीस रौप्य पुरस्कार, पलसाणा, जि. सुरत (गुजरात) आणि सुकाटी जि. केंदुझार (ओडिशा) या ग्रामपंचायतींना ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कारासाठी १० मे रोजी दिल्लीतील सेंट्रल ज्युरी टीमसमोर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सादरीकरण केले होते.

ग्रामपंचायतीने त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक दिली असून ज्याद्वारे नागरिक घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या उपक्रमातून आदिवासी पेसा गाव देखील डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकार करू शकते हे रोहिणी गावाने दाखवून दिले आहे़.

रोहिणी ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन माध्यमातून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया एक प्रभावी डिजिटल सेवा आहे.

रोहिणी ग्रामपंचायतीमार्फत ९५६ सेवा

ऑनलाइन सेवा ग्रामस्थांना घरबसल्या कशाप्रकारे देता येतील याचा विचार रोहिणी ग्रामपंचायतीने केला आहे. त्यासाठी विविध माध्यम, शासनाचे ॲकप, पोर्टल यांचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून महाऑनलाइन आयडी प्राप्त झाला आहे़, त्याद्वारे साधारण ९५६ अन्य सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविल्या जात आहेत़. त्याचप्रमाणे रोहिणी ग्रामपंचायतीत महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागातंर्गत ऑनलाइन प्रणालीचा उपयोग सेवा वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. या ग्रामपंचायतीने निर्णय, मेरी ग्रामपंचायत, चॅट जीपीटी याआधारे ग्रामस्थांचा सहभाग घेतला आहे तसेच ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या लिंक, युटयुब, फेसबुक, इस्ट्राग्राम या माध्यमातून देखील शेअर केले आहेत़.

आदिवासी गाव असूनही चांगला प्रतिसाद

रोहिणी हे गाव १०० टक्के आदिवासी गाव असतांना देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाळा, आरोग्य, अंगणवाडी, कृषी आदींमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे. अनुसूचित क्षेत्राअंतर्गत पेसा गावातील रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल सेवा प्रभावीपणे राबवल्या आहेत. नागरिक सेवांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता लक्षात घेऊन, ग्रामपंचायतींकडून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. ही सुविधा विशेषत: दुर्गम, आदिवासी भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

सार्वजनिक सेवा वितरण मॉडेल

रोहिणी ग्रामपंचायतीकडून मृत्यू प्रमाणपत्रांची सेवा ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलितपणे आणि पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून दिली जात आहे. रोहिणी ग्रामपंचायतीद्वारे मृत्यू प्रमाणपत्रांची डिजिटल सेवा केवळ नागरिक-केंद्रित आणि पारदर्शक नाही तर ग्रामीण पातळीवर डिजिटल कार्यक्षमता आणि तांत्रिक स्वावलंबनाचे एक उत्तम उदाहरण देखील आहे. ही प्रणाली गावपातळीवर एक प्रभावी सार्वजनिक सेवा वितरण मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. रोहिणी ग्रामपंचायतीचा ई-गव्हर्नन्स ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनाकडून पुरस्कार देवून नुकताच सन्मान करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in