
पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणात अडकलेले प्रांजल खेवलकर यांच्यावरील आरोपांबाबत रोहिणी खडसे यांनी शनिवारी पुण्यात सूचक विधान केले. योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला उत्तर देणार, असे सांगून त्यांनी या प्रकरणात अजून अनेक बाबी स्पष्ट होणे, बाकी असल्याचे संकेत दिले.
रोहिणी खडसे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ही भेट पक्ष संघटनेतील कामकाज व नियुक्त्यांशी संबंधित होती. पुण्यातील प्रकरणाची माहिती पवार साहेबांना असूनही, त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रांजल खेवलकर यांच्या न्यायालयीन कारवाईविषयी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, की अद्याप जामीनासाठी अर्ज दाखल केलेला नाही. हा निर्णय संपूर्ण परिवार एकत्रितपणे घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पुणे पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या तिन्ही वेगवेगळ्या जबाबांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. 'प्रिंटिंग मिस्टेक' असल्याचे पोलिसांनी मान्य केल्याचेही त्यांनी नमूद केले. 'न्यायालयाबाहेर वक्तव्य करणे योग्य नाही. आमचे वकील न्यायालयात सत्य परिस्थिती मांडतील,' असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात रोहिणी खडसेंनी गंभीर आरोप करत सांगितले की, वकिलांच्या म्हणण्यानुसार एक मुलगी पोलिसांनी मुद्दाम 'प्लांट' केली असून, हे सर्व एक 'ट्रॅप' होते. खेवलकर यांना अडकवण्यासाठी हाच हेतू होता, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आहे.
सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी यावर 'दिव्याखाली अंधार' अशी टीका केली होती. यावर उत्तर देताना रोहिणी खडसे म्हणाल्या, 'करू द्या,' अशी शांत प्रतिक्रिया दिली. विरोधी नेत्यांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित होताच त्यांनी स्पष्ट सांगितले की, सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अस; म्हणायला जागा आहे. सध्याचे सरकार बोलणाऱ्यांवरच कारवाई करत आहे.