"प्रत्येक गोष्टीला..."; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांच्या छापेमारीत पती प्रांजल खेवलकर यांना रविवारी अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोमवारी पहिल्यांदाच भाष्य केलं.
"प्रत्येक गोष्टीला..."; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया
Published on

पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांच्या छापेमारीत पती प्रांजल खेवलकर यांना रविवारी अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोमवारी पहिल्यांदाच भाष्य केलं.

प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे 'प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं', असं म्हणत योग्य वेळी सत्य बाहेर येईल, कायद्यावर आणि पोलिस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जावई गुन्हेगार असतील तर...

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही रविवारी जावयाच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना, 'गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरु आहे, त्यावरून असे काही घडू शकते याचा थोडा थोडा अंदाज मला येत होता', असं म्हणत कटकारस्थानची शक्यता वर्तवली होती. त्याचसोबत, या प्रकरणात जावई गुन्हेगार असतील तर त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणाने तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त करताना या प्रकरणात मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केला तर विरोध करणार, असंही एकनाथ खडसे म्हणाले होते.

कशी झाली अटक?

पुण्यातील खराडी या हायप्रोफाईल परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छापेमारीत दोन महिलांसह पाच पुरुषांना अटक केली. या रेव्ह पार्टीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला आहे. या सातही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या कारवाईबाबत पत्रकार परिषदेत सांगितले की, “पुणे शहरात अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवत असताना गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सव्वातीनच्या सुमारास खराडी येथील रूम नंबर १०२, स्टेबर्ड अझुर सूट हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपींकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला.”

खेवलकर यांच्या हडपसरच्या घराचीही झाडाझडती

माहितीनुसार, खराडीतील रॅडिसन हॉटेलच्या मागे असलेल्या ‘स्टेबर्ड अझुर सूट’ याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपींकडून एकूण ४१ लाख ३५ हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ, १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू व बिअरच्या बॉटल, हुक्का फ्लेव्हर असा अमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या सर्वांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) कलम ८(क), २२(ब)(११)अ, २१(ब), २७, कोटपा ७(२), २०(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर खेवलकर यांना परत हडपसरच्या घरी आणण्यात आले. या घराची झाडाझडती घेत पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्कसह विविध साहित्य जप्त केल्याचे समजते.

या सात जणांना अटक

प्रांजल मनीष खेवलकर (४१) यांच्यासह प्रसिद्ध बुकी निखिल जेठानंद पोपटाणी (३५), समीर फकीर महमंद सय्यद (४१), सचिन सोनाजी भोंबे (४२), श्रीपदा मोहन यादव (२७) तसेच ईशा देवज्योत सिंग (२२) आणि प्राची गोपाल शर्मा (२३) अशी रेव्ह पार्टीतील लोकांची नावे आहेत.

न्यायालय म्हणाले, ‘रेव्ह पार्टी’ शब्द वापरू नये; २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

रेव्ह पार्टीत सहभागी सात जणांना तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात रविवारी पहाटे आणण्यात आले. त्यांनी मद्य आणि अमली पदार्थांचे सेवन केले आहे का, हे तपासण्यासाठी सर्वांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत दोघांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने सीलबंद करून पोलिसांच्या हवाली केले आहेत. दरम्यान, रविवारी सुट्टीच्या दिवशी न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी ‘रेव्ह पार्टी’ हा शब्द वापरला असता, न्यायाधीशांनी तो शब्द वापरू नये, असे सांगितले. आरोपींनी अमली पदार्थ कुठून आणले, याचा तपास करायचा असल्याने ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, न्यायालयाने त्यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in