विजय पाठक/ जळगाव
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अदयाप उमेदवार मिळाला नसून उमेदवार निवडीसाठी सोमवारी मुंबईत बैठक होत आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रथम एकनाथ खडसे यांचे नाव जाहीर केले होते. या मतदारसंधात गेले दहा वर्ष खडसेंची सून रक्षा खडसे या प्रतिनिधीत्व करीत आहे. यामुळे सासरा विरूध्द सून असा सामना रंगेल अशी अटकळ बांधत राज्यभर हा मतदारसंघ गाजला. काही काळानंतर एकनाथ खडसे यांनी आपण प्रकृतीच्या कारणाने निवडणुक लढू शकत नसल्याचे पक्षाला कळवले . आता रक्षा खडसे यांना भाजपाकडून तिस-यांदा उमेदवारी जाहीर झााली आहे तर एकनाथ खडसे हे भाजपाच्या वाटेवर आहेत.त्यांनी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला रक्षा खडसेंविरोधात लढण्यासाठी सक्षत उमेदवाराची गरज आहे. या मतदारसंघासाठी यापूर्वी माजी आमदार संतोष चौधरी , जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , उदयोजक श्रीरात पाटील आदी नावे समोर आली होती . मात्र भाजपातूनच कुणी नाराज व्यक्ती मिळते काय याकडे राष्ट्रवादीतून चाचपणी होत होती. मात्र तसा उमेदवार आढळून आलेला नाही. अखेर यावर निर्णय घेण्यासाठी उदया सोमवारी ८ एप्रिलला मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होत असून त्यात निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे भाजपातूनराष्ट्रवादीत आले त्याचा राष्ट्रवादीला पक्ष विस्तारासाठी काही फायदा झााला नाही . त्या पक्षातून कुणी फारसे आले नाहीत. त्यामुळे आता खडसे पक्षातून गेले तरी पक्षाचा काहीही तोटा होणार नसल्याचे मत व्यक्त केले. खडसे कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा असून त्यांनी भाजपात जाण्यास नकार दिला आहे. आपण विधानसभा लढवण्यासाठी उत्सुक असून लोकसभा लढवण्यात रस नसल्याचे सांगत रावेरमधून लढण्यास नकार दिला आहे.
जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केले. दरम्यान, एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात ही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे काही संभ्रम असण्याचे कारण नाही. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश हा त्यांचा सन्मान की अगतिकता, याचे उत्तर तेच देऊ शकतील अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी प्रसार मध्यमानशी बोलताना दिली.
रावेरच्या उमेदवारी निश्चितीसाठी पुण्यातील मोदीबागेत सोमवारी बैठक पार पाडली. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील यांनी शरद पवार यांची मोदीबागेत भेट घेतली. मात्र रोहिणी खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केले. जयंत पाटील यांनीही इच्छुकांबरोबर चर्चा झाली असून, मंगळवारी निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, “मी कोणाच्या विरोधात प्रचार करणार नाही. तर माझा प्रचार माझ्या पक्षासाठी असेल, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. वडील दुसऱ्या पक्षात गेले, याचे निश्चितच वाईट वाटते. मी एकटी पडलेली नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासमवेत आहेत”, असेही त्या म्हणाल्या.