"भाजपला भीमटोला देण्याची गरज", कोल्हापूरच्या सभेत रोहित पाटील आक्रमक

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्या भाषणाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
"भाजपला भीमटोला देण्याची गरज", कोल्हापूरच्या सभेत रोहित पाटील आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातून महाराष्ट्र पिंजायला सुरुवात केली असून बीड आणि आता कोल्हापूरात आज त्यांची सभा पार पडत आहे. आज कोल्हापूर येथील निर्धार सभेत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. यावनेळी बोलताना रोहित पाटलांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

भाजपवर टीका करताना रोहित पाटील म्हणाले की, "आज देशात विघातक प्रवृत्ती जन्माला येत आहे. ज्यांनी देशात भांडणं लावली. ज्यांनी जाती-जातीत भाडणं लावण्याचा तर धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचा, देश तोडण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांची हाती आपण राज्याची आणि देशाची सत्ता आहे."

रोहित पाटील पढे म्हणाले की, भाजपच्या राज्यात महापुरुषांचा अपमान होत आहे. कोणीही उठतं छत्रपतीं शिवाजी महाराजांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतं. कोणीही उठून शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान होईल अशी वक्तव्य करत. त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला राग आला पाहीजे.

ज्या महाराजांनी मराठी माणसाला पाठीचा कणा ताठ ठेवायला शिकवलं, ज्या आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला. ज्या फुले दाम्पत्यानं सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, अशा लोकांचा जर अपमान होत असेल तर येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी मिळून भाजपला भीमटोला देण्याची गरज आहे. असं रोहित पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in