दादा अपघाताआधी एकटे वाटत होते; नरेश अरोरांच्या करारावरून पक्षातील दिग्गज नेत्यांशी बिनसले होते, रोहित पवार यांचा दावा

अजित पवार यांचे अलीकडच्या काळातील राजकीय भवितव्य उजळवून काढणारे नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यावरून त्यांच्या पक्षातीलच दिग्गज नेत्यांशी अजितदादांचे बिनसले होते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अजित पवार यांचे अलीकडच्या काळातील राजकीय भवितव्य उजळवून काढणारे नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यावरून त्यांच्या पक्षातीलच दिग्गज नेत्यांशी अजितदादांचे बिनसले होते. अजितदादांची कॉन्ट्रॅक्टसंदर्भात वेगळी भूमिका होती. त्यामुळे दादा एकटे पडले होते. अरोरांच्या करारासंबंधी बोलणी करण्याकरिता सुनील तटकरे हे त्या दिवशी अजितदादांसोबत चर्चेला गेल्याचा माझा अंदाज आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी मी सुरुवातीपासूनच करत आहे. दादांना का उशीर झाला? हे मी बोलून दाखवले, अजित पवार गाडीने गेले असते तरी ही दुर्घटना घडली नसती, असेदेखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. आमचा पक्ष भाजप-शिंदे सेनेसोबत (एनडीए) न्यायचा असता तर आम्ही कधीच गेलो असतो. आमचा संघर्ष विचारांसाठी आहे,

“गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवरचे आणि राज्यपातळीवरचे लोक त्यांच्यासोबत नव्हते. मात्र, काही मोजके आमदार दादांसोबत होते. आजही तेच आमदार दादांच्या अपघाताबाबत बोलत आहेत. हा अपघात आहे की घातपात? हाच एक मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यावेळी त्यांनीदेखील अजित पवार यांच्या अपघाताचे कारण समोर आले पाहिजे, अशी मागणी केली असेल, असे आम्हाला वाटते,” असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मोदी आणि शहा यांचा मला वेळ मिळाला नाही. मात्र, अधिवेशन चालू असल्यामुळे काही नेते बिझी असतील. मात्र मी ‘मेल’च्या माध्यमातून माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहेत.

शेवटच्या क्षणाचा निर्णय संशयास्पद वाटतो

अजितदादा २७ जानेवारीला पुण्याला कारने गेले असते, तर ते पुढील दिवशी बारामतीला पोहोचले असते आणि ही दुर्घटना टळली असती. मात्र, त्या दिवशी झालेल्या बैठकीला उशीर झाला, काही महत्त्वाचे फोन आले आणि एका फाईलवर तातडीने स्वाक्षरी करण्याची मागणी झाली. दादांनी ती स्वाक्षरी केल्यानंतर संध्याकाळी ७.१३ वाजता विमानाचे बुकिंग झाले. जर विमानाने जाण्याचा आधीच निर्णय झाला असता, तर २६ किंवा २७ तारखेलाच बुकिंग झाले असते. त्यामुळे शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय संशयास्पद वाटतो, असे ते म्हणाले.

विलीनीकरणाबाबत आमच्यात बोलणे झाले होते - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “बहीण-भावामध्ये विलीनीकरणाबाबत बोलणे झाले होते, ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे. अनेकांना विलीनीकरणाबाबत बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. मात्र अनेकांना मी बोललेले आवडत नाही. पण आज काही नेते बोलत नाहीत. पण तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की, माझे पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला, त्यामुळे काय जुने उगाच कोणाबद्दल काढावे? ठीक आहे या गोष्टी आयुष्यात होत असतात. आज दादा नाही, त्यामुळे जुनं उणदुणं काढत बसायचं नाही.”

logo
marathi.freepressjournal.in