"त्यांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल..." रोहित पवारांनी अजितदादांना पुन्हा डिवचलं

"भाजपनं लोकसभेपुरता अजितदादांचा वापर करून घेतला. येत्या काळात अजितदादांकडे राष्ट्रवादी पक्ष राहणार नाही", अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवार
रोहित पवारप्रातिनिधिक फोटो

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार असून नरेंद्र मोदी यांच्यासोबतच काही नवनिर्वाचित खासदार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. महाराष्ट्रालाही सहा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता असून यामध्ये भाजप चार, शिवसेना शिंदे गट एक तर आरपीआय आठवले गट एक अशी एकूण सहा मंत्रीपदं मिळू शकतात. दरम्यान या मंत्रीमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्यातरी एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. यावरूनच रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचलं आहे. भाजपनं लोकसभेपुरता अजितदादांचा वापर करून घेतला, असं रोहित पवार म्हणाले. येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष अजितदादांकडे राहणार नाही, भाजपच्या चिन्हावर लढायचं हा एकच पर्याय त्यांच्याकडे असेल, असा टोला रोहित पवारांनी अजितदादांना लगावला.

त्यांच्यासमोर एकच पर्याय, तो म्हणजे भाजपचं चिन्ह...

रोहित पवार म्हणाले की, "व्यक्तिगत गिफ्ट अजितदादांना दिलंच आहे, परंतु मंत्रिपद दिलं नाही. आम्ही म्हणत होतो की, लोकसभेपुरताच भाजप अजितदादांचा फायदा करून घेणार...पण फायदा तर काही झालाच नाही. लोकसभेनंतर आता विधानसभा अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांना जर लढायची असेल, तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, तो म्हणजे भाजपचं चिन्ह... तसा संदेशच भाजपच्या केंद्रातल्या मोठ्या नेत्यांनी दिलेला दिसतोय."

सगळ्यात जास्त फायदा पटेलांचा...

रोहित पवार पुढे म्हणाले की, "पटेलांवर ईडीची कारवाई निघून गेली, मात्र अजितदादा आणि तटकरे साहेबांवरील कारवाई चालूच आहेत. त्यामुळं साहेबांना सोडून जे नेते महायुतीत गेलेत, त्यापैकी सगळ्यात जास्त फायदा प्रफुल पटेलांचा झाला. त्यांना मंत्रिपद आता दिलं जाणार नसेल तर त्याचा एकच अर्थ होतो, येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष अजितदादांकडे राहणार नाही, त्यांच्याकडे एकच पर्याय असेल भाजपच्या चिन्हावर लढायचं."

logo
marathi.freepressjournal.in