MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरून तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; रोहित पवारांनी दिली सरकारला एक आठवड्याची मुदत(संग्रहित छायाचित्र)
Published on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरून तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारने एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या अन्य मागण्यांबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुण्यात पुन्हा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये आणि सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली असल्याचे पवार यांनी सांगितले. हा आंदोलनाचा शेवट नसून सरकारला आपल्या भूमिकेत सुधारणा करण्यासाठी दिलेली मुदत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एमपीएससीच्या कृषी सेवा परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी आणि रोहित पवार यांच्याकडून करण्यात येत आहे. पवार यांनी चौकशी समित्या किंवा विशेष तपास पथकाच्या माध्यमातून वेळकाढूपणा करण्याऐवजी अध्यक्षांवर थेट कारवाई करावी, अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान, भीमनवार यांनी आरोप फेटाळताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घटनांबाबत पुरावे सादर झाल्यास पदावर राहणार नसल्याचे म्हटले आहे.

यासोबतच राज्य शासनाने २०२६ मध्ये सुमारे ७० हजार पदांची मेगाभरती करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

गणेश विसर्जनापर्यंत एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत आणि ७० हजार पदांच्या भरतीबाबत ठोस निर्णय न झाल्यास पुण्यात पुन्हा आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल, असे पवार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in