आजपासून राज्याचं हिवाळी आधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादविवाद होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. आधिवेशन सुरू होण्याआधीच राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यात पेपरफुटीचे प्रकरण समोर आले होते, त्यावर भाष्य करत सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणलेल्या विधेयकावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
'राज्यात पेपरफुटीने त्रस्त झालेल्या युवकांची याबद्दल कठोर कायदा करण्याची मागणी आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत विधेयक आणलं जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. परंतु या सरकारने कॅसिनोच्या 'महत्त्वाच्या' विषयावर मात्र पहिल्याच दिवशी विधेयक आणलं. हा कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ 'अनुभवी' नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात यावे ही विनंती, अशी पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी संजय राऊत यांनी कॅसिनोमधील बावनकुळेंचा एक फोटो शेअर करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती सुरु असताना तसेच सामाजिक वातावरण बिघडलेले असताना परदेश दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका रात्रीत कॅसिनोमध्ये तब्बल साडे तीन कोटी रुपये उडवले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता.
दरम्यान, बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट करून त्यांनी महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊ येथे ते कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. मात्र राऊतांनी केलेल्या आरोपांचं बावनकुळेंनी स्पष्टपणे खंडन केलं होतं. त्यामुळे बावनकुळे चांगलेच चर्चेत आले होते.अशातच सरकारने कॅसिनोच्या विषयावर पहिल्याच दिवशी विधेयक आणलं. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन त्यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात याव, असं म्हणत रोहित पवारांनी बावनकुळेंसह सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं आहे.