
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणारी ‘देवाभाऊ’ ही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर या जाहिरात कॅम्पेनवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. सध्या महायुतीत ‘देवाभाऊ’ यांचीच चलती आहे, असा संदेश महायुतीतील काही नेत्यांना याद्वारे देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही जाहिरात भाजपच्या मित्रपक्षातील मंत्र्यानेच दिल्याचे समजते. तो मंत्री कोण हे समजलेले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यापासून महायुतीतील अंतर्गत वाद समोर येत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनावेळी फडणवीस यांनाच टार्गेट केले गेले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईबाहेर राहिले. त्यामुळे महायुतीत काहीही आलबेल नसल्याचे समोर आले. त्यातच आता मुंबई, ठाणे येथील वृत्तपत्रात संपूर्ण पानभर ‘देवाभाऊ’ अशी जाहिरात झळकली, मात्र त्या जाहिरातीत ना एकनाथ शिंदे, ना अजित पवार, त्यामुळे महायुतीत मराठा आरक्षणाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये कामाचे श्रेय लाटण्याची कोणतीच चढाओढ नाही, स्पर्धा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका टीमप्रमाणे आम्ही काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना अलीकडेच स्पष्ट केले. मात्र, तरीही महायुतीत धुसफूस सुरूच असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
रोहित पवार यांनी या जाहिरातबाजीवर टीका करताना म्हटले आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला गेलेला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता. या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री भाजपचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत, असेदेखील कळत आहे.
मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील, असे रोहित पवार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिवरायांचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नका - संजय राऊत
मराठा आरक्षणासोबत शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नाही. एक लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तुम्ही त्यांच्या नावाने जातीय राजकारण करत छत्रपती शिवाजी महाराजांना खाली आणत आहात. शिवरायांचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नका. आपला राजकीय उदो उदो व्हावा म्हणून व मुख्यमंत्र्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी काल जी जाहिरात करण्यात आली, ती देणारी व्यक्ती कोण आहे? हा सर्व पैसा दोन नंबरची कामे करणाऱ्याचा असावा, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.