
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील तहसीलदार परिसरात महादेव मुंडे यांची हत्या झाली. हत्या होऊन दोन वर्षे होत आली. मात्र आरोपी आजही फरार आहेत. त्यात आश्चर्य म्हणजे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी गोट्या गित्ते याने ८ ते ९ मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल केला असून त्यात तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी देतो. राज्यात काय चाललंय? गुंडामध्ये एवढी हिंमत येतेच कुठून, गृह विभाग करतोय काय?, असा प्रश्नांचा भडीमार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. या प्रश्नांची उत्तरे द्या, अशी मागणी त्यांनी एक्सवर पोस्ट करत केली आहे.
२१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली. महादेव मुंडे यांच्या हत्येला दोन वर्षांचा कालावधी उलटला, तरी आरोपी मोकाट फिरत आहेत. अखेर ३१ जुलै रोजी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महादेव मुंडे यांची हत्या झाली त्या दिवसापासून दोन वर्षांचा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश डीजीपींना दिले. दरम्यान, रविवारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या गित्ते याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
...याला कोण भीक घालतेय - जितेंद्र आव्हाड
हा कोण गोट्याफोट्या, याला कोण भीक घालतेय. धमक्यांना घाबरून मी माझे बोलणे बंद करणार नाही. महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हत्या प्रकरण लावून धरल्याने सगळी गँग अडचणीत आली आहे. त्यात मोठमोठी नावे आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.