
सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपकडून (BJP) ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून यासाठी नकार देण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवर लक्ष देता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना या पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी एक पत्र लिहिले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "राज ठाकरेंनी स्वतःची स्टाईल जपली पाहिजे," असा टोला लगावला आहे.
हेही वाचा :
'मी सुरुवातीपासूनच...' राज ठाकरेंनी लिहिले सर्वपक्षीय नेत्यांना पत्र
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "अंधेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले, तेव्हा राज ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांना पत्र लिहले होते. पण पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकांवेळी त्यांनी पत्र लिहिले नाही. हा भेदभाव का करण्यात आला? हे फक्त तेच सांगू शकतात. त्यांचे भाषण आणि आधीच्या स्टाईलचा मीही चाहता आहे. पण सध्या त्यामध्ये आता कुठेतरी बदल होताना दिसतो. भाजपचा प्रभाव राज ठाकरेंवर पडत असून ही गोष्ट अनेकांना भावत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे. भाजपच्या नादी लागलेले पक्ष असो अथवा व्यक्ती दोन्ही संपले आहेत."