ईडीकडून रोहित पवार यांची १२ तास चौकशी

तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार रात्री १० वाजता ईडी कार्यालयाबाहेर पडले.
ईडीकडून रोहित पवार यांची १२ तास चौकशी
Published on

प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. ईडी कार्यालयाबाहेर यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. चूक केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय? असा सवाल करताना रोहित पवार यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना आपले पूर्ण सहकार्य असेल असे स्पष्ट केले. दरम्यान, तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार रात्री १० वाजता ईडी कार्यालयाबाहेर पडले. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. सुप्रिया सुळे देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. ईडी कार्यालयाबाहेर मोठी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हानावर मात करून संघर्ष करून, पण सत्याच्या मार्गाने चालू. यंशवतराव चव्हाण यांचा वारसा आहे. तो पुढे नेण्याचे काम शरद पवार यांनी सहा दशके केले आहे. ही आमची लढाई आहे. आमच्या लढाईत दुर्दैवाने अनेक तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संसदेचा डेटा सांगतो की, ईडी, प्राप्तिकर विभागाचे ९५ टक्के केसेस विरोधकांवर आहे. यासाठी स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे रोहित पवारला नोटीस येणे ही फार आश्चर्यची गोष्ट नाही. रोहित पवारने मोठी संघर्ष यात्रा काढली असून तो राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी, सोशित पीडित आणि वंचितांसाठी काही तरी करू पाहतोय. त्यामुळे कदाचित हे सूडाचे राजकारण असू शकते अशी भावना लोकांमध्ये आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीला जाणार असल्याने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

चौकशीला पूर्ण सहकार्य करणार - रोहित पवार

मी एवढंच सांगेन अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जी कागदपत्रे मागवली ती सगळी कागदपत्रं दिली आहेत. अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करेन. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ते त्यांचं काम करतात. त्यांच्या मागे कुठला विचार, कुठली शक्ती आहे, याबाबत आज तरी सांगता येणार नाही. परंतु सामान्य लोकांसोबत चर्चा केल्यानंतर असं समजते की, सर्वसामान्यांचा आवाज महाशक्तीविरोधात उठवल्यानंतरच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे. आतापर्यंत जी माहिती मागवली आहे, ती सीआयडीला, ईडीला सुद्धा दिलेली आहे. परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी ईडी कार्यालयात जात आहे. चूक केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय? असा सवालही रोहित पवार यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in