
मुंबई : नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबीयांना बेकायदेशीर जमीन देत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच केला होता. आता या प्रकरणातील बॅग भरून ठोस पुरावे असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पुरावे हाती असल्याशिवाय बोलत नाही आणि या प्रकरणी १२ हजार पानांचे पुरावे आणल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बिवलकर कुटुंबांचा १९९३ चा अर्ज, सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज, विधी व न्याय विभागाचा अहवाल, नगर विकास विभागाने १ मार्च २०२४ ला सिडकोला दिलेले पत्र, सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र असे पुरावे माध्यमांसमोर दाखवले. बिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज २८ जुलै १९९३ आला होता. या अर्जात त्यांनी सांगितले की, आम्ही चुकीचे ठरलो, तर आम्ही पूर्ण जमीन सिडकोला देणार आहोत. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बिवलकर कुटुंब चुकीचेच ठरलेले आहेत. असे रोहित पवार म्हणाले.
शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार केला. याबाबत पुरावे आम्ही सादर केले. आम्ही १२ हजार पानांचे पुरावे बॅग भरून आणले आहेत, असे पवार म्हणाले.
गणपती होईपर्यंत शांत राहू!
संजय शिरसाटांना त्यांच्या पदावरून काढा. कारण ते सुसाट सुटले. जर तुम्हाला पैशाची गरज लागली, तर शासनाकडे या. शासनाचे पैसे संपले, तर माझी बॅग उघडी आहे, असे वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. अशा भ्रष्ट माणसाला पदावर ठेवू नका. पुरावे आम्ही दिलेले आहेत. या सर्व प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत ६१ हजार स्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब थांबवावा. ८ हजार स्वेअर मीटरचा भूखंड एका प्रायव्हेट व्यक्तीला दिलेला आहे. तो सुद्धा परत मागून घ्यावा. संजय शिरसाट यांचा दोन दिवसांत राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. गणपती होईपर्यंत आम्ही शांत राहू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.