

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताला तीन महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार मंगळवारी सकाळी १० वाजता पुण्यातील सीआयडी कार्यालयात भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. तसेच अपघात प्रकरणाची नवीन माहिती आणि कागदपत्रे सीआयडीकडे सादर करणार आहेत.
यासंदर्भात रोहित पवार यांनी सोशल माध्यमातून माहिती दिली. ते म्हणाले, अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला तीन महिने होत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्याना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनालाही एक महिना लोटला आहे. काहीही कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य जनतेत याविषयी प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असतील. परंतु आता निवडणुकादेखील झाल्या आहेत, त्यामुळे येत्या दहा दिवसांत सीबीआय तपास तसेच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल, ही अपेक्षा आहे. सीआयडी नेमके काय करत अहे, हेदेखील कळायला मार्ग नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
गेल्या २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. हा अपघात की घातपात, याबद्दल अजूनही जनतेच्या मनात शंका आहे. रोहित पवार यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरत चौकशीची मागणी केली आहे, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही याबाबत आपल्या मनात शंका असून, सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडी कार्यालयातील रोहित पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.