
मुंबई : आम्ही न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवतो आणि न्याय मिळेल, याबाबत आम्ही आश्वस्त आहोत. मी काहीही चुकीचं केलं नाही. मला कोणतीही भीती नाही. आम्ही पळून जाणाऱ्यांपैकी नाही. आम्ही लढणार आहोत, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप गट) आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ने राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे आमदार रोहित पवार यांना आरोपी बनवले. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नाही आणि त्यांना राजकीय हेतूंनी लक्ष्य केले जात आहे. एफआयआरमध्ये ९७ जणांची नावे असतानाही केवळ मला लक्ष्य केलं जात आहे. आता ही बाब न्यायालयात आहे. मी कायदेशीर लढाई लढणार असून ती जिंकणार आहे, असा दावा त्यांनी केला.
ईडीने मुंबईच्या विशेष न्यायालयात एमएससीबी घोटाळ्याच्या आरोपपत्रात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना आरोपी ठरवले आहे.
एमएससीबी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची सुरुवात २०१९ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या नोंदवलेल्या एफआयआर पासून झाली. बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी राज्यातील सहकारी साखर कारखाने त्यांच्या नातेवाईकांना/खाजगी लोकांना फारच कमी किमतीत विकले आणि या प्रक्रियेत कोणतेही कायदेशीर नियम पाळले नाहीत.
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखाना पवार यांच्या बारामती अॅग्रो लि. ने खरेदी केला होता.
रोहित पवार यांनी सांगितले, "जेव्हा ईडीने गुन्हा नोंदवला. तेव्हा त्यात ९७ जणांची नावे होती. ज्यात काही राजकीय नेतेही होते. माझं नाव नव्हतं. जेव्हा बारामती अॅग्रोने साखर कारखाना खरेदी केला, तेव्हा तिथे कोणतंही निवडून आलेलं संचालक मंडळ नव्हतं, आणि प्रशासकाच्या अखत्यारीत कारखाना होता. निविदा प्रक्रिया प्रशासकांनी राबवली होती, असे ते म्हणाले.