लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये,१० लाख विद्यार्थ्यांना महिना १० हजार रुपये विद्यावेतन; भाजपचे संकल्पपत्र जाहीर

Maharashtra assembly elections 2024: राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये, २५ लाख रोजगार, २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी बनवणार, १० लाख विद्यार्थ्यांना महिना १० हजार रुपये विद्यावेतन, उद्योग क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्यांना १५ लाखांपर्यंत कर्ज, अशा विविध आश्वासनांचा पाऊसच भाजपच्या संकल्पपत्रातून पाडण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये,१० लाख विद्यार्थ्यांना महिना १० हजार रुपये विद्यावेतन; भाजपचे संकल्पपत्र जाहीर
Published on

मुंबई : राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये, २५ लाख रोजगार, २०२७ पर्यंत ५० लाख लखपती दीदी बनवणार, १० लाख विद्यार्थ्यांना महिना १० हजार रुपये विद्यावेतन, उद्योग क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्यांना १५ लाखांपर्यंत कर्ज, अशा विविध आश्वासनांचा पाऊसच भाजपच्या संकल्पपत्रातून पाडण्यात आला आहे. दरम्यान, भाजपचे संकल्पपत्र रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @२०२९’ सादर करण्यात येणार आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरण राबवण्यासह २०२८ पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

वांद्रे बीकेसीतील हॉटेल सोफिटॉलम‌ध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियूष गोयल, विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या रकमेत वाढ करून ते १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये करण्यात येणार आहेत. २५ हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पुढील पाच वर्षे स्थिर ठेवण्यासह २५ लाख रोजगारनिर्मिती आणि १० लाख विद्यार्थ्यांना महिन्याला १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचा संकल्प भाजपने केला आहे.

२०२७ पर्यंत ५० लाख महिला बनणार लखपती दीदी

५०० बचतगटांसाठी एक हजार कोटींचा फिरता निधी

शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वर्षाला १२ हजारांवरून १५ हजार रुपये,

किमान आधारभूत किमतीवर २० टक्के अनुदान,

खतांवरील सीजीएसटी शेतकऱ्यांना मिळणार परत

सोयबिनला प्रति क्विंटल किमान सहा हजार रुपये भाव देणार

प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार

अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य

पेन्शनधारकांना २१०० रुपये

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण, आधार सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी

४५ हजार गावांमध्ये पांदण रस्ते

अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण

वीज बिलात ३० टक्के कपात, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर

नागपूर, पुणे, नाशिक शहरात बनणार एअरोस्पेस हब

logo
marathi.freepressjournal.in