छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

मराठवाडा आणि विदर्भातील मालवाहतूक नेटवर्कला बळकटी देणाऱ्या मुकुटबन ते गडचांदूर या ३८.२१ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाच्या बांधकामाला भारतीय रेल्वेने ४९३ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी
छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी(संग्रहित छायाचित्र)
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि विदर्भातील मालवाहतूक नेटवर्कला बळकटी देणाऱ्या मुकुटबन ते गडचांदूर या ३८.२१ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाच्या बांधकामाला भारतीय रेल्वेने ४९३ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या मार्गामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना कोळसा, सिमेंट तसेच अन्य मालाची वाहतूक अधिक थेट आणि कार्यक्षम पद्धतीने करता येणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या औद्योगिक आणि खाण क्षेत्रांना मजबूत रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या परिसरात सिमेंट प्रकल्प, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी तसेच चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत.

नवीन रेल्वेमार्गामुळे गर्दीच्या बल्हारशाह-नागपूर उच्च घनता रेल्वे मार्गावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील तुलनेने कमी रेल्वे कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील मालवाहतुकीचे नेटवर्क अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरला फायदा

या प्रकल्पामुळे कोळसा आणि सिमेंट उद्योगांना माजरी-नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी मिळणार आहे. परिणामी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील विविध प्रमुख गंतव्यस्थानांकडे माल पोहोचविण्यास लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्राला अप्रत्यक्षपणे चालना मिळण्याची शक्यता आहे.

वर्षाला ६.०८ दशलक्ष टन मालवाहतूक

नवीन रेल्वेमार्गामुळे विद्यमान वर्धा-माणिकगड रेल्वे विभागावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर दरवर्षी सुमारे ६.०८ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याचे नियोजन आहे. दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन मेमू गाड्या चालविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in