Pune : गांधी हत्येनंतर संघावर बंदी; सावरकरांच्या नातलगांची न्यायालयात साक्ष

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्यात आली होती, याला विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयातील उलटतपासणीदरम्यान दुजोरा दिला.
Pune : गांधी हत्येनंतर संघावर बंदी; सावरकरांच्या नातलगांची न्यायालयात साक्ष
Pune : गांधी हत्येनंतर संघावर बंदी; सावरकरांच्या नातलगांची न्यायालयात साक्षसंग्रहित छायाचित्र
Published on: 

पुणे : महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्यात आली होती, याला विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयातील उलटतपासणीदरम्यान दुजोरा दिला. मात्र, संघ समाजासाठी धोकादायक असल्याच्या कारणामुळे ही बंदी घालण्यात आली होती का, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानीप्रकरणी सुनावणी झाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात सात्यकी सावरकर यांनी हा खटला दाखल केला आहे. राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सात्यकी यांची उलटतपासणी घेतली.

सुनावणीदरम्यान महात्मा गांधी यांच्या हत्येच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती जीवनलाल कपूर आयोगाच्या अहवालाची प्रत वकिलांनी न्यायालयात संदर्भासाठी सादर केली. सात्यकी यांनी ही प्रत मान्य केल्याचे वृत्त आहे. या आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष आणि त्यासंबंधीचे संदर्भही सुनावणीदरम्यान चर्चेत आले.

याशिवाय सावरकरांचे कौटुंबिक जीवन, त्यांचे पुत्र विश्वास सावरकर आणि सून सुंदर सावरकर यांच्याविषयीही प्रश्न विचारण्यात आले. सोशल मीडियावरील काही ऐतिहासिक दाव्यांबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सात्यकी यांनी सांगितले.न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने उलटतपासणी पूर्ण होऊ शकली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

गांधी यांची हत्या मुस्लिमांनी केल्याचे भासवण्याचा कट सावरकर आणि त्यांच्या सहआरोपींनी रचला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, गांधीहत्या खटल्याचा निकाल आधीच लागला असल्याने अशा स्वरूपाचे प्रश्न विचारू नयेत, अशी भूमिका सात्यकी यांनी मांडली. त्यावर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हरकत नोंदवली. उलटतपासणीदरम्यान सावरकरांच्या हिंदुत्वविषयक विचारांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. हिंदू समाजाच्या संघटनाला सावरकरांनी महत्त्व दिले होते, या विधानाशी सात्यकी यांनी सहमती दर्शवली. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेला स्पष्ट समर्थन दिल्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याच्या विधानाशी त्यांनी असहमती दर्शवली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in