
आशिष सिंह/मुंबई : भारताच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना पाकिस्तानच्या आयएसआयचा ताजा कट उघडकीस आला आहे. नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय हे प्राथमिक लक्ष्य असल्याची माहिती मिळाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'ला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई रचण्यात आली असून, पाकिस्तानकडून दावा केला जात आहे की, या भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.
सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, आयएसआयने आपल्या प्रॉक्सी गटांना आदेश दिला आहे की "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारताचे वैचारिक केंद्र आहे" आणि त्यावर होणारा हल्ला हा प्रतीकात्मक व मानसिक धक्का देणारा ठरेल. गुप्तचर अहवालांमध्ये उघड झाले आहे की, नागपूर, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा येथील संघाच्या कार्यालयांची जीपीएस लोकेशन्स, छायाचित्रे आणि कार्यवाही नकाशे गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कटामुळे दहशतवादी संघटनांचे संघटन सुरू झाले आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट आदी गटांना आयएसआयने सक्रिय केले असून, स्थानिक सुरक्षित घरे, रेकी आणि लॉजिस्टिक सपोर्टची तयारी सुरू आहे. विशेषतः आरएसएस कार्यालयांच्या प्रवेश व निर्गमनाची तपशीलवार नोंद, सुरक्षा तपासणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्देशांचा विस्तार सार्वजनिक स्थळे, मंदिरे आणि महत्वाच्या अधोसंरचनेपर्यंत झाला आहे.
याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी कडक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत. राज्य पोलिसांना बहुस्तरीय देखरेख, जलद प्रतिसाद पथक व परिधीय तपासणी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील गणेशोत्सव काळात धोका जास्त असल्याचे सांगण्यात आले असून, मोठ्या गर्दीचे उत्सव कार्यक्रम दहशतवादी हल्ल्यासाठी सोपे लक्ष्य ठरू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
सोशल मीडिया, एन्क्रिप्टेड मेसेजिंग, क्रॉस बॉर्डर संवाद व आर्थिक व्यवहारांवर सायबर युनिट्स लक्ष ठेवून आहेत. डिजिटल पुरावे गोळा करून दहशतवादी हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.
आयएसआयच्या सूडात्मक योजनेचा वेध, आरएसएसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आणि गणेशोत्सवाचा काळ या तिघांच्या संगमामुळे सुरक्षा यंत्रणा अत्यंत सजग झाल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई, बहुस्तरीय देखरेख आणि जलद प्रतिसाद हाच नागरिकांच्या सुरक्षेचा एकमेव पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गणेश मंडपांची तपासणी करा
राज्य पोलिसांना मंदिरे व गणेश मंडपांची तपासणी, गर्दीच्या बाजारपेठांवर नजर, स्वयंसेवकांची पडताळणी यांचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेशद्वारांवर कडक तपासणी आणि जलद प्रतिसाद पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबईत संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की गणेशोत्सव काळात १७ हजाराहून अधिक पोलिस तैनात राहतील. यात १४,४३० कॉन्स्टेबल, २,६३७ अधिकारी, ५१ एसीपी, ३६ डीसीपी यांचा समावेश असेल. एसआरपीएफ, रॅपिड अॅक्शन फोर्स, दंगा नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्बॅट युनिट्स, होमगार्ड्स आणि हजारो स्वयंसेवकांची मदत घेतली जाईल. ११ हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, गुप्त पोशाखातील पोलीस, मोबाइल पथकं आणि बीट मार्शल्स कार्यरत राहतील. लालबागचा राजा, गिरगाव व जुहू चौपाटी यांसारख्या प्रमुख मंडळांना बॉम्ब डिटेक्शन व डिस्पोजल स्क्वॉड विशेष सीसीटीव्ही कव्हरेज आणि वॉचटॉवर्सची सुविधा दिली आहे.