
पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये कार्यरत असलेल्या एका युवा निवासी डॉक्टरने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरने आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी पोलिसांना सापडली आहे, त्यामुळे आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
डॉ. श्याम व्होरा (वय २८) असे या मृत डॉक्टरचे नाव आहे. ते मूळचे गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी होते आणि रेडिओलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. गेल्या एक वर्षापासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
ही घटना ढोले पाटील रस्त्यावरील रुबी हॉल रुग्णालयाजवळच असलेल्या 'दामोदर भवन' या डॉक्टरांच्या वसतिगृहात घडली. हे वसतिगृह रुबी हॉल प्रशासनातर्फे चालवले जाते आणि तिथे ८० ते १०० डॉक्टरांची राहण्याची सोय आहे. डॉ. व्होरा याच इमारतीत इतर एका डॉक्टरसोबत राहत होते. रविवारी रात्री श्यामची खोली बराच वेळ बंद असल्याने सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी अनेक वेळा बेल वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी श्यामने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले.
कामाच्या ठिकाणी छळवणुकीचा निष्कर्ष निराधार
रुबी हॉल क्लिनिकच्या कायदेशीर सल्लागार, मंजुषा कुलकर्णी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, डॉ. श्याम व्होरा यांच्या दुखद निधनाबद्दल आम्ही खूप दुःखी आहोत. मात्र, माध्यमांमध्ये सुरू असलेली 'कामाच्या ठिकाणी छळवणुकीचा निष्कर्ष पूर्णपणे निराधार आणि चुकीची आहे.