

कराड: कराड शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचा वावर असल्याच्या अफवा पसरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ओमकार खंडु बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट व्हिडीओ तयार केला आणि व्हॉट्सॲपसह इतर सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
वनविभागाच्या तपास पथकाला भ्रमणध्वनी संदेश प्राप्त झाल्यानंतर तातडीने संबंधित ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मात्र, परिसरात वाघाचा कोणताही वावर नाही, तसेच कोणत्याही नागरिकाने प्रत्यक्ष वाघ पाहिल्याची माहितीही मिळाली नाही, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
कराड वनविभागाच्या माध्यमातून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच सोशल मीडियावर अप्रामाणिक किंवा बनावट व्हिडीओ पुढे प्रसारित न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, संशयित व्हिडीओ कराड पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तांत्रिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला असून, दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. तपास ललिता पाटील (वनक्षेत्रपाल, कराड), आनंद जगताप (वनपाल, मलकापूर), अक्षय पाटील (वनरक्षक, शेणोली), अभिजीत शेळके (वनरक्षक, नांदगाव) तसेच RRT टीमचे अजय महाडीक व रोहित कुलकर्णी यांनी केला आहे.
कडक कारवाईची मागणी
सध्या परिसरात बिबट्याचे धुमाकूळामुळे लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अफवा पसरवणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे ही गंभीर समस्या असल्याचे जनतेतून सांगितले जात आहे. पोलीस आणि संबंधित विभागांनी दोषींवर कडक आणि तत्काळ कारवाई करून या प्रकारावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी लोकांमध्ये व्यक्त केली जात आहे.