कमळ-मशालीच्या दिलजमाईची अफवा; बातमी पेरण्यात आल्याचा 'मविआ'चा दावा

कमळ-मशालीच्या दिलजमाईची अफवा; बातमी पेरण्यात आल्याचा 'मविआ'चा दावा

आठवड्याची सुरुवातच या अफवांनी झाल्यामुळे एकीकडे जागावाटपावरून घमासान सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्पष्टीकरणासाठी धावाधाव करावी लागली.
Published on

मुंबई : २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर २५ वर्षांची मैत्री तोडून एकमेकांपासून दुरावलेले शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा सोमवारी राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांमध्ये ‘मातोश्री’वर गुप्त बैठक झाली असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी फोनवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याच्या अफवांचे पेव फुटले. त्यामुळे कमळाबाई आणि मशालीमध्ये पुन्हा दिलजमाई होणार, अशी चर्चा प्रसारमाध्यमांवर रंगू लागली. मात्र, ही अफवा असून, ‘मविआ’त दरी निर्माण करण्यासाठी कुणीतरी ही बातमी पेरल्याचे ‘मविआ’च्या नेत्यांनी जाहीर केल्याने या अफवांवर पडदा पडला.

आठवड्याची सुरुवातच या अफवांनी झाल्यामुळे एकीकडे जागावाटपावरून घमासान सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्पष्टीकरणासाठी धावाधाव करावी लागली. स्थितीचे गांभीर्य ओळखून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व स्वतः संजय राऊत यांनी पुढे येत ही बातमी पेरण्यात आल्याचा दावा केला. दुसरीकडे, भाजपने मात्र याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

जागावाटपावरून सध्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तणातणी सुरू असल्यामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप रखडले आहे. काँग्रेसच्या हायकमांडने लक्ष घातल्यानंतरही आणि शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतरही अद्याप महाविकास आघाडीला जागावाटपाबाबत यश मिळालेले नाही. त्यातच आता शिवसेना ठाकरे गट भाजपशी संपर्कात असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर काँग्रेसनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

औरंगजेब, अफजलखानाशी हातमिळवणी नाही - संजय राऊत

“संजय राऊतांची अमित शहा यांच्याशी भेट झाली, हे सांगितले जातेय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. शिवसेनेने एवढा संघर्ष महाशक्तीसोबत जाण्यासाठी केला आहे का? आमचा लढा महाराष्ट्राचे शत्रू, महाराष्ट्राला लुटणाऱ्यांविरोधात आहे. या लुटारूंच्या सरदारांशी आमचे नाव जोडले जात आहे. त्यातून केवळ भाजपची भीती दिसून येते. हे षडयंत्र आहे. त्यात आणखी काही लोकांचा हात असू शकतो. शिवसेना कधीही अशा ताकदींशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्यासोबत जाणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे औरंगजेब आणि अफजलखानाशी हातमिळवणी करण्यासारखे आहे,” असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले की, “स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. अशा अफवा पसरवून कोणी लढणार असेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. कोणी सुपाऱ्या दिल्या याची बातमी आमच्याकडे आली आहे. आमचीही यंत्रणा आहे. आमच्यावर संशय घेणारे एका बापाची औलाद नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. त्यांनी बाप दाखवावा, नाहीतर श्राद्ध घालावे.”

माध्यमांनी आमच्यात भांडण लावू नये!

“विदर्भातील जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. माध्यमांनी उगीच आमच्यात भांडण लावू नये. मंगळवार सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे जागावाटप जाहीर होईल. आम्ही मेरिटच्या आधारावर उमेदवार देऊ. काँग्रेसची पहिली उमेदवार यादी मंगळवारी जाहीर होईल. शरद पवारांनी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला फोन केला नाही,” असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

आमचा फेव्हिकॉलचा जोड, तो तुटणार नाही!

“महाविकास आघाडी अभेद्य आहे. ही बातमी साफ खोटी आहे. काँग्रेस व ठाकरे गटात तणाव वाढवण्यासाठी भाजपने या बातम्या पेरल्या आहेत. पण आमचा फेव्हिकॉलचा जोड आहे, तो तुटणार नाही. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणतीही भेट झाली नाही. भाजपकडून आमच्यात वाद निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. कारण, भाजपची प्रचंड घाबरगुंडी उडाली आहे. संजय राऊत यांना तुरुंगात कुणी पाठवले? त्यामुळे अशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे. संजय राऊत व अमित शहांतील कथित चर्चेवरही आमची हायकमांडशी कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्यातील जागावाटपाचा पेच जवळपास संपला आहे. मंगळवारपर्यंत सर्व काही सुरळीत होईल,” असे काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in