खरातशी कोणताही संबंध नाही; २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा

बीडमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर २८ दिवसांनंतर आपले मौन सोडले आहे. खरात प्रकरणातील कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात किंवा इतर कोणत्याही दुष्कृत्यात आपला अथवा आपल्या कुटुंबाचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे.
खरातशी कोणताही संबंध नाही; २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा
खरातशी कोणताही संबंध नाही; २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा
Published on

पुणे : बीडमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर २८ दिवसांनंतर आपले मौन सोडले आहे. खरात प्रकरणातील कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात किंवा इतर कोणत्याही दुष्कृत्यात आपला अथवा आपल्या कुटुंबाचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे.

केवळ तर्कवितर्क, अंदाज आणि रंजक अफवांच्या आधारे आपली व कुटुंबाची बदनामी केली जात असून, ज्या निनावी पत्रावरून हे आरोप केले जात आहेत, त्या पत्राची निर्मिती कोणी केली आणि ते कोठून आले याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडताना सांगितले की, बीडमधून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना एक निनावी पत्र पाठवले होते.

या पत्रात असा दावा करण्यात आला की, बीडमधील एका महिला पदाधिकाऱ्यामार्फत स्थानिक महिलांना अशोक खरातकडे पाठवले जात होते आणि हे सर्व कथितपणे रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने घडत होते. कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी हे पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्रे घडवून आणली गेली, असा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, बीडचे पोलीस अधीक्षक यांनीही स्पष्ट केले आहे की, ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही, अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने त्याला महत्त्व देता येत नाही. तरीही हे पत्र कोणाच्या ‘सौजन्याने’ माध्यमांपर्यंत पोहोचले, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निष्पक्षपाती चौकशीसाठी गप्प बसले

चाकणकर म्हणाल्या की, एसआयटी आणि तपास यंत्रणांना निष्पक्षपातीपणे चौकशी करता यावी, हाच आपला हेतू होता. याच तपासाचा भाग म्हणून नुकतीच चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची एसआयटीने सुमारे १० तास चौकशी केली. या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडण्यात आले असून, त्यातील कोणत्याही व्यवहाराशी त्यांचा संबंध नाही. मानसिक त्रास देण्यासाठी बेछूट आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले, ना प्रसारमाध्यमांनी ते मागितले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in