गिरीश चित्रे / मुंबई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ‘पीए’च्या माध्यमातून पैसे वसुली करायचे, असा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला आहे. वाझे याच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे वाझे याने म्हटले आहे. दरम्यान, तुरुंगात असलेला वाझे मीडियाशी बोलला कसा याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी फडणवीस यांनी दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांच्या टार्गेटवर फडणवीस आले आहेत. त्यात दोन खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे वसुली करायचे, असा आरोप बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला आहे. वाझे याच्या आरोपानंतर सत्ताधारी विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत.
विरोधकांना विशेष करून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी फडणवीस यांनी माझ्यावर दबाव आणला होता. प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र पाठवले होते, मात्र चक्क नकार दिल्याने तुरुंगवास भोगावा लागेल, अशी धमकी फडणवीस यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप देशमुख यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी वाझे याला पुढे केले असून फडणवीस नवी खेळी खेळत असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. मात्र सचिव वाझेवर खुनाचे दोन आरोप असून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्र्यांचा गुन्हेगारांशी संबंध - जयंत पाटील
आजकाल तुरुंगात असणाऱ्या माणसांच्या मुलाखती होत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. त्यांना उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुरुंगात असलेल्या सचिन वाझे याच्या वक्तव्यावर दिले. वाझे याने देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून पत्र लिहिले आहे. गृहमंत्र्यांचा तुरुंगातील गुन्हेगारांशी पत्रव्यवहार सुरू आहे, हे यातून दिसून येते. गृहमंत्री माझे हितचिंतक आहेत, वाझे याने काय लिहिले ते देवेंद्र फडणवीस मला सांगतील, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
संशयाला वाव - सुषमा अंधारे
सचिन वाझे याने फडणवीसांना लिहिलेले पत्र म्हणजे लोकांना मूर्ख समजण्याचा हा यांचा उद्योग, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. वाझे याने फडणवीस यांना पत्र लिहावे, यामध्येच संशयाला वाव असल्याचे सुषमा अंधारे यांचे म्हणणे आहे.
वाझेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करा - अतुल लोंढे
निलंबित पोलीस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही, मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी झाली पाहिजे तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस होते त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
देशमुख-वाझेच्या वादात रावसाहेब दानवेंची उडी!
देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे वसुली करायचे असा आरोप केल्यानंतर सत्ताधारी विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. या वादात आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे उतरले आहेत. त्यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ईडीची कारवाई होऊन ते पैसे अनिल देशमुखांकडे सापडले नसतील तर ते पैसे कोणत्या रस्त्याने, कोणत्या नेत्याजवळ पोहोचले याची चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख हे मध्यस्थ आहेत. कर्ताधर्ता बाहेरच आहे. पैशाचा शोध घेण्याच्या वाटा शोधल्या पाहिजे. सचिन वाझे आणि अन्य चौकडीच्या माध्यमातून हा शोध लागेल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मी जो भांडाफोड केला, त्यानंतर फडणवीस यांची झोप उडाली असून वाझे याला हाताशी धरून फडणवीस नवी चाल चालत आहेत. असे सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाझेंच्या आरोपाची चौकशी करणार
वाझे यांनी नव्याने केलेल्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सचिन वाझे देशमुख व पाटील यांच्यावर केलेल्या आरोपाचे पत्र पाठवल्याचेही मला प्रसारमाध्यमातून समजले आहे, असेही ते म्हणाले.