मुंबई : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांचा निडरपणे मुकाबला करणारे, अत्यंत मृदुभाषी परंतु तितकेच कर्तव्यकठोर म्हणून ख्याती असलेले भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी सदानंद वसंत दाते (५९) यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’चे (एनआयए) प्रमुख असलेले सदानंद दाते येत्या ३ जानेवारी रोजी नव्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ३ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत.
शुक्ला यांच्या जागेवर नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने त्यासाठी सात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती. सदानंद दाते यांचे नाव यात प्रामुख्याने चर्चेत होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सातपैकी तीन नावांची निवड करून ती राज्य सरकारकडे पाठवली होती. त्यातून सदानंत दाते यांच्या नियुक्तीवर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘डीजीपीं’चा कार्यकाळ किती?
सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निकाल आणि आदेशांनुसार, 'पोलीस महासंचालक’ (एचओपीएफ) या पदावर नियुक्त झालेल्या भारतीय पोलीस सेवेच्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. त्यानुसार, भारतीय पोलीस सेवेचे सदानंद वसंत दाते हे नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी पोलीस महासंचालक या पदावर राहतील.
विविध पदे भूषविली
सदानंद दाते १ एप्रिल २०२४ पासून राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक (डीजी) होते. यापूर्वी त्यांनी सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख, मुंबईतील सहपोलीस आयुक्त (गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था) आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरार प्रदेशांचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
दाते यांनी वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट (पीएच.डी.), इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून पात्र कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि हम्फ्रे फेलोशिप अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठात व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रणाचा अभ्यास केला आहे.