सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक? NIA च्या प्रमुखपदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव

महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांचे नाव शर्यतीत आघाडीवर आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे.
सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक? NIA च्या प्रमुखपदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव
सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक? NIA च्या प्रमुखपदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव
Published on

मुंबई : महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांचे नाव शर्यतीत आघाडीवर आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना कार्यमुक्त करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या वर्षअखेरीस म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यातच राज्याच्या गृह विभागाने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) सात अधिकाऱ्यांची नावे पाठवली होती, त्यात दाते यांचे नाव असल्यामुळे लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सदानंद दाते राज्याचे पोलीस महासंचालक झाल्यास, त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२७ पर्यंत असेल. पुणे येथे १४ डिसेंबर १९६६ रोजी जन्मलेले सदानंद दाते १९९०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून दाते ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलिस, एसपी नवी मुंबई आदी पदांवर काम केले आहे. ३१ मार्च २०२४ रोजी त्यांची एनआयएचे महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्लॅक कॅट’ कमांडोनी विविध ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास, फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा तपास आणि २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यासाठी सदानंद दाते यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

यूपीएससीने तीनसदस्यीय अधिकाऱ्यांच्या पॅनेलची निवड केल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकाची निवड केली जाणार आहे. या पदावर दाते यांची निवड झाल्यास, ते ३१ डिसेंबर रोजी सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांच्याकडून सूत्रे हाती घेतील.

logo
marathi.freepressjournal.in