
मुंबई : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने साहित्य अकादमीचे २३ भारतीय भाषांमधील पुरस्कार बुधवारी जाहीर केले. त्यात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत आणि तरुण लेखक प्रदीप कोकरे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मराठी कादंबरीला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहाला ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीच्यावतीने सन-२०२५ साठीचे २४ भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि २३ भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ बुधवारी जाहीर करण्यात आले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. त्यात देशभरातील २३ लेखकांना साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले. डोगरी भाषेतून कोणताही पुरस्कार जाहीर करण्यात आला नाही. पुरस्कारप्राप्त लेखकांचा ताम्रपटासह ५० हजार रुपये देऊन गौरव करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारासाठी विचारार्थ अंतिम यादीमध्ये पाच पुस्तके होती. त्यात कैलास दौंड यांचा ‘आई मी पुस्तक होईन’ (कवितासंग्रह), सुरेश वांदिले यांची ‘आम्ही स्मार्ट मुले’ (कादंबरी), सुरेश सावंत यांचा ‘आभाळमाया’ (कवितासंग्रह), प्रशांत असनारे यांचा ‘मोराच्या गावाला जाऊया’ (कवितासंग्रह) आणि वर्षा गर्जेंद्रगडकर यांचा ‘सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा’ हा कथासंग्रह होता. यातून निवड समितीच्या सदस्यांनी बहुमताने सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाची निवड केली. बाल पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून एकनाथ आव्हाड, सुषमा नवंगुल आणि लक्ष्मण कडू यांनी काम पाहिले.
साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराच्या अंतिम यादीमध्ये ७ पुस्तके होती. त्यात आदित्य दवणे यांचा ‘युद्धानंतर’ (कवितासंग्रह), चिन्मय किरण मोघे यांची ‘तथागत’ (कादंबरी), पूजा भडांगे यांचा ‘ऐहिकाच्या मृगजळात’ (कवितासंग्रह), प्रदीप कोकरे यांची ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ (कादंबरी), प्रवीण रतिलाल पवार यांची ‘ऑनलाइन प्रेमाची ऑफलाइन कहाणी’ (कादंबरी), सागर संजय जाधव यांचे ‘माती मागतेय पेनकिलर’ आणि सुमेध कुमार इंगळे यांची ‘महामाया निळावंती’ ही कादंबरी होती. युवा पुरस्कार निवड समितीमध्ये सदस्य म्हणून प्रा. अविनाश कोल्हे, प्रा. इंद्रजित भालेराव आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी काम पाहिले. त्यांनी बहुमताने प्रदीप कोकरे यांच्या कादंबरीची निवड केली.
डॉ. सुरेश सावंत यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य असे विपुल साहित्य लेखन केले आहे. डॉ. सावंत यांचा राष्ट्रपती पुरस्कारासह महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्काराने तीन वेळा गौरव करण्यात आला आहे. जळगाव येथे नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. सावंत यांनी भूषविले होते.
मुंबईतील वडाळा येथील प्रदीप कोकरे यांनी मराठीतून एमए ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे २०२२-२३ सालची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. या कादंबरीला यशवंतराव चव्हाण सेंटरचा ना. धो. महानोर पुरस्कारही मिळाला आहे.
राज्यातील दोन साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.