
मुंबई : ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणचे ३ नर व ५ मादी असे एकूण ८ वाघ आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील डोंगराळ भागात वाघांची डरकाळी कानी पडणार आहे. मंत्रालयातील उपवन महानिरीक्षक डॉ. सुरभी राय यांनी राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक अधिकाऱ्यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील वाघांचे स्थलांतर करावे, अशी मागणी होत होती. यासंदर्भात केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय वन्यजीव विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम १२ अंतर्गत परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून ११ सप्टेंबर २०२५ रोजी याबाबतचे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. या स्थलांतर प्रक्रियेत नियमित देखरेख, अहवाल सादरीकरण आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखणे बंधनकारक असून याआधी झालेल्या स्थलांतर मोहिमांचे अहवाल मंत्रालयाकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. परंतु या प्रक्रियेदरम्यान कोणताही अपघात होऊन वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास परवानगी नाकारली जाईल, असे स्पष्ट आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढून जैवविविधतेत भर पडेल, असा विश्वास राज्य सरकारच्या वन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सह्याद्रीत वाघांची डरकाळी
कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या डोंगररांगांमध्ये पसरलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील तुलनेने नवीन व्याघ्र प्रकल्प मानला जातो. येथे वाघांचे अस्तित्व आहे. परंतु संख्या स्थिर नाही. शिकार प्रजातींची उपलब्धता, दाट जंगल व योग्य अधिवास असतानाही वाघांची हालचाल मर्यादित राहण्यास मदत होणार आहे.
वाघांच्या संख्येत वाढ
महाराष्ट्रात वाघांची संख्या गेल्या १९ वर्षांत लक्षणीयरीत्या वाढत आहे. सन २००६ मध्ये १०३ वरून ती २०२२ पर्यंत अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनानुसार ४४४ वर पोहोचली, तर २०१० मध्ये १६९, २०१४ मध्ये १९०, तर २०१८ मध्ये ३१२ वर पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे.
या अटी-शर्तीचे पालन बंधनकारक
वाघांचे पकड व स्थलांतर राज्य वन विभागाच्या देखरेखीखालीच करावे
संपूर्ण प्रक्रियेत पशुवैद्यकीय काळजी सुनिश्चित करावी
पकडीनंतर गुंतागुंत होऊ नये याची काळजी घ्यावी
स्थलांतराच्या वेळी वाघांना किमान मानसिक व शारीरिक त्रास होईल याची दक्षता घ्यावी
स्थलांतरापूर्वी, दरम्यान व नंतर नियमित देखरेख करून अहवाल मंत्रालयाला सादर करावा
याआधी झालेल्या स्थलांतराच्या अहवालांची माहिती मंत्रालयाला सादर करावी