
कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील स्थानिक रहिवाशांनी येथील वाघांवर प्रेम व्यक्त करत त्यांना ‘सेनापती’, ‘सुभेदार’ आणि ‘बाजी’ अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिकांचा वाघांशी असलेला संबंध अधिक दृढ झाला असून, व्याघ्र संवर्धनामध्ये लोकसहभागाची भावना वाढीस लागली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन नर वाघ आहेत. या वाघांना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या पदव्यांवरून नावे देण्यात आली आहेत. वन विभागाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये या वाघांना सांकेतिक क्रमांक दिले जातात, पण पर्यटकांमध्ये आणि स्थानिक निसर्गप्रेमींमध्ये वाघांविषयी अधिक आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी वन विभागाने या स्थानिक नावांना मान्यता दिली आहे.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले. त्याच धर्तीवर, या वाऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या वाघांना स्वराज्यातील सरदारांची नावे देऊन स्थानिकांनी गौरव केला आहे. या प्रयत्नांमुळे व्याघ्र संवर्धनासोबतच स्थानिक संस्कृतीचा सन्मानही जपला जात आहे.
एसटीआर-टी१ (‘सेनापती’): पाच वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात या वाघाची नोंद झाली. सर्वप्रथम नोंद झालेला वाघ म्हणून त्याला ‘सेनापती’ हे नाव देण्यात आले आहे. सध्या हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानात आहे.
एसटीआर-टी२ (‘सुभेदार’): हा वाघ मूळचा कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील आहे. २८ ऑक्टोबर रोजी तो १०० किलोमीटर दूर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात टिपला गेला. त्याला ‘सुभेदार’ असे नाव देण्यात आले आहे.
एसटीआर-टी३ (‘बाजी’): हा वाघ २०२३ साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपला गेला होता. २०२५ मध्ये तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आला. तो कोकणातील चिपळूण वनपरिक्षेत्रातही जाऊन आला होता. या वाघाला ‘बाजी’ असे नाव दिले आहे.