सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन गावाला अखेरचा दंडवत; जंगलातच थाटला संसार! पुनर्वसन विभागाचा कारभार चव्हाट्यावर

महाबळेश्वरजवळच्या जावळी तालुक्यातील जंगलातच ठाण मांडून भूमिपुत्रांनी आपला संसार जंगलातच उघड्यावर जंगली प्राण्यांची भीती न बाळगता थाटला आहे. त्यामुळे पुनर्वसन विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन गावाला अखेरचा दंडवत; जंगलातच थाटला संसार! पुनर्वसन विभागाचा कारभार चव्हाट्यावर
Published on

कराड : साताऱ्यातील जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील सह्याद्री वाघ्र प्रकल्पाने विस्थापित झालेल्या भूमिपुत्रांचे ज्या आदिवासी भागात पुनर्वसन झाले, त्या ठिकाणी त्यांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे अखेर त्यांनी पुनर्वसन झालेल्या गावाला अखेरचा दंडवत केला आहे.

महाबळेश्वरजवळच्या जावळी तालुक्यातील जंगलातच ठाण मांडून भूमिपुत्रांनी आपला संसार जंगलातच उघड्यावर जंगली प्राण्यांची भीती न बाळगता थाटला आहे. त्यामुळे पुनर्वसन विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्त मूळ गावी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. जंगलातील कोअर झोनचा त्यांनी आश्रय घेतला आहे. 

जावळी, महाबळेश्वर याच मतदारसंघातील पुनर्वसन व मदत कार्यमंत्री मकरंद पाटील हे राज्यात नेतृत्व करतात. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावच्या नजीकच भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे तर राज्यातील इतर विस्थापितांची काय अवस्था असेल? असा प्रश्न प्रकल्पबाधित करत आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव ता. भिवंडी जि. ठाणे या ठिकाणी सन २०१५ साली पुनर्वसन करण्यात आले. एकूण १२० प्रकल्पग्रस्त खातेदारांकरीता त्या ठिकाणी शासनाकडून २४२ हेक्टर जागा दिली होती. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण ७० कुटुंबांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. त्यापैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले. शुक्रवारी सुमारे २२ प्रकल्पग्रस्त मिनी ट्रॅव्हल्सने आपल्या जन्मभूमीत आले. तेथील पडक्या, उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारती समोर संसार मांडून तेथे ठाण मांडले आहे.

यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वनपरिक क्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली.

पायी मार्गाने मूळ गाव गाठले

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी जंगलातील मूळ गावी येऊ नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली होती. तरीही जीव वाचवण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त आडोशी येथील त्यांच्या मूळ गावातील शाळेसमोर आले. मात्र,या शाळेतील खोलीमध्ये मेलेल्या म्हशीचे सांगाडे आढळून आले, दुर्गंधीही पसरली होती. पुनर्वसनाने अच्छे दिन येतील असे वाटणाऱ्या भूमिपुत्रांना आता मागील सरकारच्या राजवटीतील बुरे दिन जगण्याचे बळ देत असल्याची टीका होऊ लागलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in