पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदीतून ८ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला पुण्यातील मुक्कामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरातच मुक्कामी राहणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी हमीपत्रानंतर आळंदी देवस्थान आणि पालखी सोहळा मालक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बुधवारी ही घोषणा केली. या निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि बैठकांना पूर्णविराम मिळाला असून वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बुधवारी ८ जुलै रोजी दुपारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे आळंदी मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. त्यानंतर ९ आणि १० जुलै २०२६ रोजी हा सोहळा पुण्यातील भवानी पेठ येथील विठोबा मंदिरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावेल. आळंदी देवस्थानच्या भक्त निवास येथे झालेल्या या परिषदेला प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, ॲड. रोहिणी पवार, भाऊ महाराज फुरसुंगीकर, व्यवस्थापक माऊली वीर आणि दिंडी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी जागेची टंचाई आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे मुक्कामाची जागा बदलण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भाविकांच्या सोयीसाठी विशेष पावले उचलली आहेत. प्रशासनाने दिलेल्या हमीपत्रात अतिक्रमण हटवून प्रशस्त रस्ता तयार करणे, अनधिकृत बांधकामे काढणे आणि रहदारीला अडथळा ठरणारे पोल हलवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मंदिरालगतची जागा ताब्यात घेऊन विस्ताराचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती देवस्थानने दिली.
पूर्वीच्याच ठिकाणी मुक्काम कायम
पुणे जिल्हा प्रशासनाने सेवा-सुविधांबाबत लेखी आश्वासन दिले असून पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त करणे आणि रस्ते रुंदीकरणामुळे सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास ॲड. राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने आणि जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पूर्वीच्याच ठिकाणी मुक्काम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.