

मुंबई : काँग्रेसचे अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीच्या नावाने पुन्हा जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत गाजला.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा अशी धमकी आल्याने काँग्रेस आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी धमकीची दखल घेत पठाण यांच्या सुरक्षेप्रकरणी योग्य निर्णय घेण्याची सूचना सरकारला केली.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी पठाण यांना बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याबाबतचा मुद्दा गुरुवारी सभागृहात उपस्थित केला.
पठाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा अवलंबला. आपल्याला या प्रकरणाचे राजकारण करायचे नसून वारंवार मिळणाऱ्या धमक्या गंभीर आहेत, असे पठाण यांनी सांगितले.