गणेशोत्सवाचा जल्लोष; साखरचौथीच्या गणरायाचे उत्साहात आगमन; उरण, पेण, मुरूडसह ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण

यंदा साखरचौथी अंगारकी चतुर्थीच्या शुभयोगावर आल्याने गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
गणेशोत्सवाचा जल्लोष; साखरचौथीच्या गणरायाचे उत्साहात आगमन; उरण, पेण, मुरूडसह ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण
Published on: 

राजकुमार भगत /उरण

पितृपक्षात येणाऱ्या साखरचौथीच्या गणपतींची उरण तालुक्यात मंगळवारी (२९ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली.

यंदा साखरचौथी अंगारकी चतुर्थीच्या शुभयोगावर आल्याने गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. विशेषतः चिरनेर गावात गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांत, विशेषतः आगरी समाजात, साखरचौथीच्या गणेशोत्सवाची जुनी परंपरा आहे. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला साखरचौथी किंवा गौरा गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.

साधारणपणे दीड, अडीच, तीन किंवा पाच दिवसांनी या गणपतींचे विसर्जन केले जाते. मुख्य गणेशोत्सवाच्या काळात काही कारणास्तव घरी किंवा मंडळात गणपतीची स्थापना करता न आलेले भाविक साखरचौथीला गणरायाची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मुख्य गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा उत्सवाचे वातावरण निर्माण होते.

श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या चिरनेर येथील श्री महागणपती मंदिरात अंगारकी चतुर्थी आणि साखरचौथीचा योग आल्याने पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गावोगावी ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे उरणच्या ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. साखरचौथीच्या निमित्ताने गणेशभक्तांनी मोठ्या श्रद्धेने गणरायाचे स्वागत केले.

‘पंचक्रोशीचा राजा’ विराजमान

संजय करडे/मुरूड-जंजिरा : मुरूड तालुक्यातील यशवंतनगर, नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयात अंगारकी चतुर्थीनिमित्त साखरचौथीच्या गणपतीचे मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्साहात आगमन झाले. दरवर्षी विद्यालयात विराजमान होणाऱ्या ‘पंचक्रोशीचा राजा’ या गणपतीचे यंदाचे दहावे वर्ष आहे. २०१६ पासून विद्यालयात गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू आहे. शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा विद्यमान संचालक चिंतामणी जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक परंपरा व संस्कृतीची जपणूक व्हावी, तसेच या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने दरवर्षी गणरायाचे स्वागत केले जाते. मंगळवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात ‘पंचक्रोशीचा राजा’चे विद्यालयात आगमन झाले. ज्येष्ठ पुरोहित शैलेश जोशी यांच्या हस्ते मंत्रोच्चार आणि विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. पूजेचा मान विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर आणि त्यांच्या पत्नी पूर्वा पेडणेकर यांना मिळाला. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना खोत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संचालक मंडळाचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. विद्यालयात सुरू असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख होत असल्याचे दिसून आले.

रायगड जिल्ह्यातआज झाली साखरचौथ गणरायाची प्राणप्रतिष्ठापना
रायगड जिल्ह्यातआज झाली साखरचौथ गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

पेणमध्ये १५० सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींची स्थापना

अरविंद गुरव / पेण : रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या गणेशोत्सवाला मंगळवारी (२९ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यात यंदा ५६८ सार्वजनिक आणि ४५३ घरगुती, अशा एकूण १,०२१ साखरचौथीच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पेण शहरात सुमारे ६५ सार्वजनिक आणि ८५ घरगुती गणपतींची स्थापना झाली. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सवानंतर वद्य संकष्टी चतुर्थीला साखरचौथीचा गणेशोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी दीड दिवस, तर काही ठिकाणी अडीच, तीन किंवा पाच दिवस गणरायाचा मुक्काम असतो. गेल्या काही वर्षांत या उत्सवाचे स्वरूप विस्तारले असून सार्वजनिक मंडळांची संख्याही वाढताना दिसत आहे. पेण शहरात साखरचौथीच्या गणेशोत्सवाची विशेष क्रेझ पाहायला मिळते. मोठ्या गणेशमूर्ती, आकर्षक सजावट, भव्य सभामंडप, विद्युत रोषणाई, विविध देखावे आणि विसर्जन मिरवणुका ही या उत्सवाची वैशिष्ट्ये ठरत आहेत. अष्टविनायक मित्र मंडळ, गुरव आळीचा राजा, कासार आळीचा राजा, दत्त मित्र मंडळ, प्रेमनगरचा राजा, सुखकर्ता मित्र मंडळ, गांगल आळीचा राजा, ओरिजिनल अष्टविनायक आणि भाई सुधाकर पोटे मित्र मंडळासह विविध मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. पेणमध्ये या उत्सवाला गणपती मूर्तीकारांचा उत्सव असेही संबोधले जाते. वर्षभर गणेशमूर्ती बनविणाऱ्या अनेक मूर्तिकारांना मुख्य गणेशोत्सवात घरी गणपतीची स्थापना करणे शक्य होत नसल्याने साखरचौथीला ते आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे या उत्सवाला पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाशीही विशेष नाते जोडले गेले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in