छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामागे समर्थ रामदास; योगी आदित्यनाथ यांचे आळंदी येथे विधान

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देऊन अनुष्ठानचे महत्त्व समजावून सांगितले होते
छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामागे समर्थ रामदास; योगी आदित्यनाथ यांचे आळंदी येथे विधान

पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला रविवारी उपस्थिती दर्शवली. यावेळी स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांची योगी आदित्यनाथ यांनी प्रशंसा केली. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम केले, त्याप्रमाणेच श्री गोविंददेव गिरी महाराज आज काम करत आहेत, असे विधान केले. दरम्यान, गोविंददेव गिरी महाराज हे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देऊन अनुष्ठानचे महत्त्व समजावून सांगितले होते. त्यांच्या विधानवरून बरीच टीका झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधानांशी तुलना करण्याचा हा प्रकार असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. त्यानंतर रविवारी योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याची ओळख गोविंददेव गिरी महाराज यांच्या कामाला दिली आहे.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, मला आळंदीत येण्याची खूप पूर्वीपासूनची इच्छा होती. मी लहानपणी ज्ञानेश्वरीचे वाचन केले होते. तेव्हापासून मला दिव्यविभूतीचे दर्शन घ्यायचे होते. अवघ्या १५ व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे लिखाण करून ज्यांनी २१ व्या वर्षी समाधी स्वीकारली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आज मला दर्शन घेता आले.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरती आहे, कारण या मातीला पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले. इथल्या भक्तांनी आपल्या संताना एका उंचीवर नेले आहे. त्यामुळे इथल्या भक्तांमध्ये शक्तीचा संचाल झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने आपण त्याचा प्रत्यय घेतला.”

शरद पवारांकडून योगींचा समाचार

समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खरा इतिहास काय आहे, तो जगाला माहिती आहे. आमच्या दृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण, जिजाबाईंनी केलेले कर्तृत्व बाजूला सारून त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.

रोहित पवारांकडून निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी घडवलं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे केलं. या विधानाचा रोहित पवारांनी निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंऐवजी तिसऱ्याच व्यक्तीने घडवलं, असं कुणी म्हणत असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो. अजित पवार गट पूर्वी भाजप विरोधात असताना अशा विधानांचा निषेध करत होता. आज ते भाजपबरोबर गेले आहेत, त्यामुळे या विधानावर ते आता काय भूमिका घेणार? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in