
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेना ठाकरे गटाने ‘संभाजी ब्रिगेड’ संघटनेला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती आता तुटली असून राज्यात ‘संभाजी ब्रिगेड’ स्वबळावर लढणार आहे. राज्यात आम्ही ५० हून अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ‘ब्रिगेड’चे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉ गंगाधर बनबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते. आखरे म्हणाले की, “संभाजी ब्रिगेड गेल्या ३५ वर्षांपासून शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा घेऊन कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर संभाजी ब्रिगेडची युती झालेली होती. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेना आणि मविआचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्य़ातून किमान ४ ते ५ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विधानसभेच्या जागावाटपात आम्हाला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
“शिवसेनेबरोबरची युती तोडून महाविकात आघाडीतून आम्ही बाहेर पडत आहोत. जात धर्म व फॅसिस्ट शक्तींना ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहिला असून तो कायम राहील. संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न व महामानवाचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुमारे ५० जागांवर आमचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. महायुतीची सनातन विषमता व आघाडीचे नकली पुरोगामित्व याविरोधात समाजमत तयार करण्याची गरज आहे,” असे डॉ. बनबरे यांनी सांगितले.
जरांगेंना संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ भेटणार
संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाबाबतची भूमिका यापूर्वी जाहीर केली आहे. मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेड यांची मराठा आरक्षणाबाबत एकसारखी भूमिका आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन निवडणूक लढवू शकते. त्यावर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे एक शिष्टमंडळ लवकरच जरांगे यांची भेट घेऊन एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देणार आहे.