
भाजपने केलेल्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे उत्तर देणार नाही, असं कधीच होणार नाही. अशातच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'नॅनो मोर्चा'च्या टीकेला उत्तर देताना एका व्हिडीओ शेअर केला आणि भाजपसह मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी प्रहार करण्यास सुरुवात केली. यातच आता छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील त्यांच्यावर टीका केली आहे. 'असे कृत्य करताना जरा तरी तमा बाळगा,' असे म्हणत त्यांनी संजय राऊतांची कानउघाडणी केली.
संभाजीराजे यांनी पोस्ट केले आहे की, "ज्या मराठी मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवलं, तोच मराठी क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही वापरात आहात. आमच्या या मोर्चाची चेष्टा करणारेदेखील तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवलं, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा," असे म्हणत संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
घडलेल्या प्रकारानंतर टीकाकारांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मराठा समाजाचा मोर्चा आमचा नव्हता का? मी कधीच म्हंटले नाही की, तो मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. हे लोक त्याला नॅनो मोर्चा म्हणतात. मी दोन्ही मोर्चांचे व्हिडिओ टाकले. दोन्ही मोर्चे राज्याच्या स्वाभिमानासाठी होते. त्यासाठी भाजपला इतकी टिका करण्याचे कारण नाही," पुढे संभाजी राजेंनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, "माझे ट्विट नीट पाहा, वाचा मी काय लिहिले आहे ते. तोही मोर्चा आमचाच होता, महाराष्ट्राचाच होता. त्याने आणि कालच्या मोर्चानेही महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवली. संभाजी राजेंनी भाजपच्या नादाला लागू नये. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी योग्य भूमिका घ्यायला हवी."