

नवी दिल्ली : छत्रपती संभाजीराजे यांनी गुरूवारी दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट घेतली. या बैठकीत रायगड दुर्गावर चालू असलेल्या संवर्धन कामांबाबत तसेच गडावरील अनधिकृत व्यावसायिक बांधकाम व अतिक्रमणबाबत सविस्तर चर्चा झाली.
संभाजीराजे म्हणाले की, रोपवे कंपनीकडून रायगडावर अनधिकृत व्यावसायिक बांधकाम करण्यात आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाने या बांधकामांबाबत वेळोवेळी पुरातत्त्व विभागाला आक्षेप नोंदवला, मात्र पुरातत्त्व विभागाच्या नोटीस आणि आदेशांकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण केले गेले. अशा परिस्थितीत या कंपनीवर कायदेशीर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
...तर पुरातत्त्व विभाग जबाबदार
संभाजीराजे म्हणाले, अशा प्रकारच्या आधुनिक व अनधिकृत बांधकामामुळे नुकताच रायगडास मिळालेला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात येऊ शकतो. भविष्यात अशी वेळ आली तर रोपवे कंपनी, तिला पाठीशी घालणारे लोक आणि पुरातत्त्व विभाग यांच्यावर पूर्ण जबाबदारी राहील.
बैठकीत उपस्थित अधिकारी बैठकीस भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांच्यासह भीमा अजमेरा (संचालक, संवर्धन), सुंदर पॉल (संचालक, संवर्धन, ए.एम.व्ही. सुब्रह्मण्यम (संचालक, स्मारके) हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शासकीय रोपवे प्रस्तावित
संभाजीराजे यांनी रायगड विकास प्राधिकरण मार्फत शासकीय रोपवे उभारण्याची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल, असे सांगितले. हा रोपवे युनेस्को मानांकनानुसार जागतिक दर्जाचा असेल. प्रवाशांसाठी सुरक्षित, किफायतशीर आणि रायगडच्या सौंदर्यास अनुकूल असेल. या शासकीय रोपवेमुळे अनधिकृत कंपनीची मुजोरी मोडीत पडेल आणि पर्यटकांना योग्य पर्याय मिळेल.