
मुंबई : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून तो राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले.
राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा
समृद्धी महामार्गावरील इगतपुरी येथील बोगदा ८ किलोमीटर लांबीचा आहे. हा बोगदा राज्यातील सर्वाधिक लांबीचा व देशातील सर्वाधिक रुंदीचा आहे. अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरी बोगद्यात बसविण्यात आली आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर सुमारे आठ मिनिटांत पार करता येणार आहे. यामुळे कसारा घाटाला पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक जलद होणार आहे.
महामार्ग राज्याच्या विकासात ‘गेम चेंजर’ - शिंदे
समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात ‘गेम चेंजर’ ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवताना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, असेही आवाहन शिंदे यांनी केले.
- समृद्धी महामार्गासाठी लागल्या १२ कोटी सिमेंट बॅग
-प्रकल्प खर्च ६१ हजार कोटींवर, खर्चात ६ हजार कोटींनी वाढ
-सहा- मार्गिका असलेला (३+३) ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग
-नागपूर-मुंबई प्रवासाचा वेळ १८ तासांवरून फक्त ८ तासांवर
- प्रकल्पासाठी ८ हजार ८६१ हेक्टर जमीन संपादित
-७ लाख मॅट्रिक टन स्टील, ८ कोटी घनमीटर खोदकाम