

वर्धा : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक भीषण दुर्घटना घडली. एका ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. हा अपघात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास विरूळ गावाजवळ, इंटरचेंज आयसी-८० जवळ घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एथेनॉल वाहून नेणारा एक कंटेनर ट्रक समृद्धी महामार्गावर उलटला होता. त्यामुळे एका लेनवरील वाहतूक बंद करून दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांना लगेचच आग लागली. या दुर्घटनेत कारमधील ४ प्रवासी आणि धडक देणाऱ्या ट्रकचा चालक व सहप्रवासी (असे २ जण), अशा एकूण ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक विरुद्ध दिशेच्या लेनवरून वळवण्यात आली होती, ज्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती पाहता पोलिसांनी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता.
त्याऐवजी नागपूर-अमरावती महामार्गाचा वापर करून अमरावती गेट इंटरचेंजवरून पुन्हा समृद्धी महामार्गावर जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आकडेवारी चिंताजनक
महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, समृद्धी महामार्गावर २०२४ मध्ये १३७ अपघात झाले होते, तर २०२५ मध्ये या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ होऊन अपघात संख्या १८५ वर पोहोचली आहे. ७०१ किमी लांबीचा हा ६ लेनचा महामार्ग टप्प्याटप्प्याने डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी उघडण्यात आला आहे. रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी आणि देखरेखीसाठी येथे 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' लागू करण्याचे काम सध्या सुरू आहे.